ऑस्ट्रेलिया आयसीसी महिला टी20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. यावेळचा अंतिम सामना कांगारू संघाशिवाय खेळला जाणार आहे. विशेष म्हणजे, पहिल्या महिला टी20 विश्वचषकानंतर ऑस्ट्रेलियन संघ प्रथमच अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही.
महिला विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत सहा वेळचा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिकेनं 8 गडी राखून पराभव केला. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध हा पहिलाच विजय आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघानं सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला. याआधी त्यांनी 2022 मध्ये अंतिम फेरी गाठली होती.
दक्षिण आफ्रिकेचा महिला संघ 2022 टी20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. तर दक्षिण आफ्रिकेच्या पुरुष संघानं 2024 टी20 विश्वचषकात अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. आता महिला संघानं सलग दुसऱ्यांदा विजेतेपदाच्या लढतीत प्रवेश केला आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ शेवटचा 2009 च्या टी20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पराभूत झाला होता. यानंतर कांगारुंनी सलग 6 सेमीफायनल सामने जिंकले. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा केवळ तिसरा विजय आहे.
सामन्याबद्दल बोलायचं झाल्यास, प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियानं 5 गड्यांच्या मोबदल्यात 134 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेनं 17.2 षटकात 2 विकेट गमावत 135 धावा करत सामना जिंकला. दक्षिण आफ्रिकेसाठी ऍनी बॉशनं सर्वाधिक 74 धावा केल्या, ज्यात 8 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता, तर कर्णधार लॉरा वॉलवॉर्टनं 42 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून बेथ मुनीनं 44 धावा केल्या तर एलिस पेरी 31 धावा करून बाद झाली. कर्णधार तालिया मॅकग्रानं 27 धावांची खेळी केली.
आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 9 विश्वचषकांपैकी ही केवळ दुसरी वेळ आहे, जेव्हा ऑस्ट्रेलियन संघ अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियानं महिला टी20 विश्वचषकात सलग 15 विजयांची नोंद केली होती. संघ गेल्या सात विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. मात्र आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियाचं सलग आठव्या फायलनमध्ये पोहोचण्याचं स्वप्न भंग केलं.
हेही वाचा –
बंगळुरू कसोटीच्या तिसऱ्या दिवशी रिषभ पंत विकेटकिपिंग का करत नाहीये? बीसीसीआयनं जारी केलं अपडेट
टीम इंडिया अजूनही जिंकू शकते बंगळुरू कसोटी, कराव लागेल फक्त हे काम
काय सांगता! जोफ्रा आर्चरनं 10 वर्षांपूर्वीच केली होती भारत 46 धावांवर ऑलआऊट होण्याची भविष्यवाणी!