नेपाळ क्रिकेट संघ टी20 विश्वचषक 2024 मध्ये इतिहास रचण्यापासून थोडक्यात मुकला. शनिवारी (15 जून) झालेल्या स्पर्धेच्या 31 व्या सामन्यात नेपाळचा बलाढ्य दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटच्या चेंडूवर अवघ्या एका धावेनं पराभव झाला.
यंदाच्या टी20 विश्वचषकात आणखी एक अपसेट होणार होता. किंग्सटाउनमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघानं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून केवळ 115 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, नेपाळचा संघ 7 गडी गमावून 114 धावाच करू शकला. नेपाळनं हा सामना जिंकला असता, तर हा टी20 विश्वचषकाच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा अपसेट ठरला असता.
एकेकाळी सामना पूर्णपणे नेपाळच्या ताब्यात होता. त्यांना विजयासाठी 24 चेंडूत 21 धावांची आवश्यकता होती आणि त्यांच्या 7 विकेट शिल्लक होत्या. मात्र, यानंतर नेपाळनं आपल्या 4 विकेट झटपट गमावल्या आणि सामना रोमांचक झाला. शेवटच्या षटकात नेपाळला 3 चेंडूत 4 धावांची गरज होती. यानंतर त्यांनी दोन धावा घेतल्या मात्र पाचव्या चेंडूवर एकही धाव आली नाही.
यानंतर नेपाळला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर दोन धावा आणि सुपर ओव्हरसाठी एका धावेची गरज होती. मात्र, दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज बार्टमॅन यांनं फलंदाज गुलशन झा याला बीट केलं. नेपाळचा फलंदाज बाय म्हणून धाव काढण्यासाठी पळाला, पण तो धावबाद झाला. अशा प्रकारे दक्षिण आफ्रिकेनं अवघ्या 1 धावेनं विजय मिळवला आणि नेपाळनं हातातील सामना गमावला.
BIGGEST HEART-BREAKING MOMENT IN NEPAL CRICKET HISTORY. ???? pic.twitter.com/aUeJPAoBvv
— Johns. (@CricCrazyJohns) June 15, 2024
जर नेपाळच्या संघानं हा सामना जिंकला असता, तर हा त्यांच्या क्रिकेट इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरला असता. या पराभवानंतर नेपाळचे खेळाडू आणि चाहते अत्यंत दु:खी दिसत होते. अनेक खेळाडूंचे डोळे पाणावले होते. नेपाळचा क्रिकेट संघ प्रथमच कोणत्याही मोठ्या स्पर्धेत सहभागी झाला आहे. जेथे-जेथे नेपाळचे सामने आहेत, तेथे-तेथे त्यांना चाहत्यांकडून खूप सपोर्ट मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
टी20 विश्वचषकातून बाहेर पडलेल्या पाकिस्तानला दुहेरी झटका, 2026 च्या स्पर्धेत थेट एंट्री मिळणार नाही!
टी20 विश्वचषकातून बाद होताच सौरभ नेत्रावळकरनं उडवली पाकिस्तानची खिल्ली, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
अमेरिका विरुद्ध आयर्लंड सामना पावसामुळे रद्द, सुपर 8 साठी अमेरिका क्वालिफाय






