सध्या यूएई आणि ओमानमध्ये टी २० विश्वचषक स्पर्धेचा थरार सुरू आहे. १७ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या स्पर्धेतील पात्रता फेरीतील सामने सुरू आहेत. तर दुसरीकडे सुपर -१२ फेरी सुरू होण्यापूर्वी सर्वच संघ सराव सामने खेळण्यात व्यस्त आहेत. बुधवारी (२० ऑक्टोबर) या स्पर्धेतील सराव सामन्यात पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आमनेसामने होते. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तान संघाला शेवटच्या चेंडूवर पराभूत करून ६ गडी राखून विजय मिळवला.
पाकिस्तानची मोठी धावसंख्या
या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर पाकिस्तान संघाकडून प्रथम फलंदाजी करताना बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांची जोडी मैदानावर आली होती. परंतु या दोंघांनाही मोठी खेळी करता आली नाही. पाकिस्तान संघाकडून फखर झमानने २८ चेंडूंमध्ये ताबडतोड ५२ धावांची खेळी केली. तर आसिफ अलीने ३२ आणि शोएब मलिकने २८ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर पाकिस्तान संघाला २० षटकाअखेर ६ बाद १८६ धावा करण्यात यश आले होते.
पाकिस्तान संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना रॅसी वॅन डर डसेनने ५१ चेंडूंमध्ये नाबाद १०१ धावांची खेळी केली. तर टेंबा बवूमाने ४२ चेंडूंमध्ये ४६ धावा केल्या.या खेळ्यांच्या जोरावर दक्षिण आफ्रिका संघाने शेवटच्या चेंडूवर ६ गडी राखून विजय मिळवला.
शेवटच्या षटकाचा थरार
दक्षिण आफ्रिका संघाला हा सामना जिंकण्यासाठी अखेरच्या षटकात १९ धावांची आवश्यकता होती. या षटकातील पहिल्याच चेंडूवर डसेनने गगनचुंबी षटकार मारला. दर दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर डेविड मिलर स्ट्राइकवर आला आणि त्याने देखील षटकार मारला. तर चौथ्या चेंडूवर मिलरने डसेनला एक धाव काढत स्ट्राइक दिली. त्यानंतर पुढील दोन चेंडूंवर वान दर डसेनने सलग दोन चौकार मारले आणि दक्षिण आफ्रिका संघाला विजय मिळवून दिला.





