येत्या १७ ऑक्टोबरपासून युएई आणि ओमानमध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वच संघ जोरदार तयारी करत आहेत. दरम्यान दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा टी-२० सामना रविवारी (१३ सप्टेंबर) कोलंबो येथे पार पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने श्रीलंका संघाला ९ गडी राखून पराभूत करत मालिका २-० ने आपल्या खिशात घातली आहे.
या सामन्यात यजमान श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. श्रीलंका संघाचा सलामीवीर फलंदाज कुसल परेराने संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. परंतु इतर कुठल्याही फलंदाजाला साजेशी कामगिरी करता आली नाही. कुसल परेराने २ चौकार आणि १ षटकाराच्या साहाय्याने ३० धावांची खेळी केली होती. त्यानंतर ऍडम मार्करमने त्याला पायचीत करत माघारी धाडले होते.
कुसल परेरा बाद झाल्यानंतर राजपक्षाने २० धावांची खेळी केली. परंतु इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे श्रीलंका संघाचा संपूर्ण डाव अवघ्या १८.१ षटकात १०३ धावांवर संपुष्टात आला. दक्षिण आफ्रिका संघाकडून शम्सी आणि एडेन मार्करमने प्रत्येकी ३-३ गडी बाद केले.
श्रीलंका संघाने दक्षिण आफ्रिका संघासमोर विजयासाठी १०४ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर फलंदाज हेंड्रिक्स १८ धावा करत माघारी परतला. परंतु क्विंटन डी कॉकने चौफेर फटकेबाजी करत तुफानी अर्धशतक झळकावले. त्याने ७ चौकारांच्या साहाय्याने ५८ धावांची खेळी केली. तर गोलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या ऍडम मार्करमने फलंदाजीमध्येही मोलाचे योगदान दिले. त्याने ३ चौकरांच्या साहाय्याने नाबाद २१ धावांची खेळी केली. यासह दक्षिण आफ्रिका संघाला ३५ चेंडूंचा खेळ शिल्लक असताना ९ गडी राखून विजय मिळवून दिला. (South Africa beat Srilanka by 9 wickets in second T20I)
या विजयानंतर दक्षिण आफ्रिका संघाने ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-० ची विजयी आघाडी घेतली आहे. तर मालिकेतील अंतिम टी-२० सामना मंगळवारी (१४ सप्टेंबर) पार पडणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
युएई टप्प्यात ‘हे’ समालोचक आयपीएल सामन्यांमध्ये आणणार आणखी रंगत, १० भारतीय दिग्गजांचा समावेश
शास्त्री आणि सहकारी ‘या’ दिवशी परतणार मायदेशी! पण त्याआधी कोरोना निगेटिव्ह येणे आवश्यक
टी२० विश्वचषक २०२१ साठी ‘असे’ आहेत सर्व १६ संघ, पाहा प्रत्येक टीम फक्त एका क्लिकवर