टी२० विश्वचषक २०२१ च्या सुपर १२ फेरीच्या चौथ्या दिवशी पहिला सामना गतविजेत्या वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान दुबई येथे खेळला गेला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने उत्कृष्ट सांघिक कामगिरी करत आठ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने गुणतालिकेत गुणांचे खाते उघडले. तर दुसरीकडे वेस्ट इंडीज अ गटामध्ये अखेरच्या स्थानी कायम राहिले. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एन्रिक नॉर्किए याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
वेस्ट इंडीजच्या फलंदाजांची हाराकिरी
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बवुमा याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडीजसाठी एविन लुईस व लेंडल सिमन्स यांनी सलामी दिली. लुईसने ३५ चेंडूंमध्ये शानदार ५६ धावांची खेळी केली. दुसरीकडे सिमन्स अत्यंत कासवगतीने खेळत होता. त्याने ३५ चेंडूंमध्ये केवळ १६ धावा केल्या. कर्णधार कायरन पोलार्डने २६ धावांची खेळी करत संघाचा डाव १४३ पर्यंत पोहोचवला. दक्षिण आफ्रिकेसाठी प्रिटोरियसने सर्वाधिक तीन तर नॉर्किए व केशव महाराज यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.
दक्षिण आफ्रिकेचा शानदार विजय
वेस्ट इंडीजने दिलेल्या १४४ धावांचा पाठलाग करताना कर्णधार टेंबा बवुमा धावबाद झाला. मात्र, रिझा हेंड्रिक्स ३९ व वॅन डर डसेनने नाबाद ४३ धावांची खेळी केली. चौथ्या क्रमांकावर आलेल्या एडेन मार्करमने तुफानी खेळी करताना २६ चेंडूमध्ये नाबाद ५१ धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेने केवळ दोन गडी गमावत हे आव्हान पार केले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध निसटता पराभव झाल्यानंतर हा विजय त्यांना स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी फायदेशीर ठरेल. दुसरीकडे, वेस्ट इंडीजला पुढील सर्व सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील.