युएईत सध्या टी२० विश्वचषकाचा थरार सुरू झाला आहे. यावेळी स्पर्धेत भारत आणि वेस्टइंडिज सारख्या बलाढ्य संघांना पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. वेस्ट इंडिजला पहिल्याच सामन्यात इंग्लंडकडून लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या ५५ धावांत सर्वबाद झाला होता. त्यांच्याकडून ख्रिस गेलने (१३) सर्वाधिक धावा केल्या होत्या.
वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल गेल्या काही काळापासून फ्रँचायझी आणि राष्ट्रीय संघात सलामीला येण्याऐवजी नंबर-३ वर खेळत आहे. गेलने या स्थानावर चांगल्या धावा केलेल्या नाहीत. मात्र, वेस्टइंडिज संघाचे प्रशिक्षक एस्टविक यांच्या मते तिसऱ्या क्रमांकावर गेलच योग्य ठरेल.
वेस्ट इंडिजच्या संघाने मंगळवारी (२६ ऑक्टोबर) टी२० विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसरा सामना खेळला आहे. या सामन्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना एस्टविक म्हणाले होते की, ‘ख्रिस गेल खूप अनुभवी आहे. इतर अनेक संघांवर नजर टाकली तर त्यांना त्यांच्या फिरकीपटूंकडून अधिक गोलंदाजी करवून घ्यायची आहे. आम्हाला वाटते की तिसऱ्या क्रमांकावर आल्याने ख्रिस गेलला फिरकी आक्रमणाचा सामना करण्यासाठी आणखी वेळ मिळेल.’
युनिव्हर्स बॉस म्हणून प्रसिद्ध असलेल्या गेलचा टी२० प्रकारामध्ये १३८.८१ चा स्ट्राइक रेट होता आणि त्याची सरासरी ३० इतकी होती. पण तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत असल्याने आता त्याची सरासरी १९ झाली आहे.
ख्रिस गेलची ड्रेसिंग रूममध्ये उपस्थिती आकड्यांपेक्षा जास्त महत्त्वाची असल्याचे एस्टविक यांचे मत आहे. ते म्हणाले, ‘ख्रिस गेल हा वेस्ट इंडिज क्रिकेटचा उत्कृष्ट खेळाडू आहे. त्याच्याकडून आम्हाला अजूनही चांगल्या गोष्टींची अपेक्षा आहे. ड्रेसिंग रूममध्ये त्याच्याकडे खूप काही सांगण्यासारखे आहे आणि तो तरुण खेळाडूणांना मदतही करत आहे.’
एस्टविक म्हणाले, ‘कधीकधी आपण फक्त फॉर्म बघतो आणि विचार करतो की खेळाडू आता चांगला राहिला नाही. पण अशा क्रिकेपटूकडे खूप अनुभव असतो जो संघांसाठी उपयुक्त ठरत असतो.’
ख्रिस गेलने वेस्ट इंडिजकडून टी२० क्रिकेटमध्ये दोन शतकांसह १८७९ धावा केल्या आहेत. गेलने गेल्या पाच वर्षांत आंतरराष्ट्रीय स्तरावर २७ डावांत केवळ एक अर्धशतक झळकावले आहे. टी-२० विश्वचषकाच्या संघात त्याच्या निवडीवरही अनेक प्रश्नही उपस्थित झाले होते.
एस्टविक म्हणाले, ‘लोक विसरतात की ख्रिस गेल ऑफ स्पिन गोलंदाजीही करू शकतो. आम्ही ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलो तेव्हा ख्रिस गेलने चांगली गोलंदाजी केली होती. त्यामुळे ख्रिस गेलच्या संघात अनेक भूमिका आहेत.
कर्णधार कायरण पोलार्ड याने स्पर्धेपूर्वी सांगितले होते की, मी गेलला पाठिंबा देत असून तो चांगली कामगिरी करेल. एस्टविक यांनीही अशाच गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले, ‘गेलच्या सध्याचा फॉर्म पाहू नका, त्याचा भूतकाळात पाहा. त्याने विश्वचषक स्तरावर दमदार कामगिरी केली आहे. मला खात्री आहे की ख्रिस गेल या स्पर्धेत नक्कीच चांगली कामगिरी करेल.’
महत्वाच्या बातम्या-
न्यूझीलंडच्या विश्वचषक मोहिमेला जबर धक्का; ‘हा’ अनुभवी गोलंदाज झाला स्पर्धेबाहेर
‘वेस्ट इंडिज संघ येथे फिरायला आलाय’; माजी भारतीय खेळाडूची जहरी टीका
मार्करमच्या वादळात उडाली वेस्ट इंडिज; दक्षिण आफ्रिकेचा आठ गड्यांनी दणदणीत विजय