श्रीलंका व दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन टी२० सामन्यांची मालिका मंगळवारी (१४ सप्टेंबर) समाप्त झाली. मालिकेतील अखेरच्या सामन्यात पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने यजमान श्रीलंकेचा १० गडी राखून मोठा पराभव केला. याचबरोबर त्यांनी मालिकेत ३-० अशी सरशी साधली. दक्षिण आफ्रिकेने या विजयासह एक मोठ्या विक्रमाची नोंद केली. श्रीलंकेला श्रीलंकेत ३ किंवा त्यापेक्षा अधिकच्या टी२० सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
दक्षिण आफ्रिकेचा शानदार विजय
कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दसुन शनाका याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याचा हा निर्णय फसला. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांच्या शिस्तबद्ध माऱ्यापुढे श्रीलंकेचा डाव ८ बाद १२० असा मर्यादित राहिला. अनुभवी सलामीवीर कुसल परेराने सर्वाधिक ३९ धावांचे योगदान दिले. त्यासोबतच, कर्णधार शनाकाने १८ व करूणारत्नेने २४ धावा काढल्या. दक्षिण आफ्रिकेसाठी कगिसो रबाडा व जे फॉरच्युन यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.
दक्षिण आफ्रिकेचा मोठा विजय
यजमानांनी दिलेल्या तुटपुंज्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचे अनुभवी सलामीवीर क्विंटन डी कॉक व रिझा हेंड्रिक्स यांनी कोणतीही जोखीम न पत्करता संघाला १४.४ षटकात आरामात विजय केले. डी कॉकने नाबाद ५९ तर, हेंड्रिक्सने नाबाद ५६ धावा काढल्या. सामनावीर आणि मालिकावीर असे दोन्ही पुरस्कार मालिकेत दमदार कामगिरी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकला देण्यात आले.
दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू केशव महाराज या मालिकेत प्रथमच राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करत होता. नियमित कर्णधार टेंबा बवुमा दुखापतग्रस्त असल्याने त्याला ही संधी देण्यात आली होती. या मालिकेत सहभागी झालेले व आयपीएलमध्ये करारबद्ध असलेले दोन्ही संघांचे खेळाडू बुधवारी सकाळी आयपीएलचा उर्वरित हंगाम खेळण्यासाठी दुबई ला रवाना होतील. आयपीएल २०२१ चा उर्वरित हंगाम १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.