स्वतःवर असलेला विश्वास आणि त्याला मेहनतीची जोड दिली की माणूस यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. काहींना हे यश अगदी कमी वयात मिळते तर, काहींना यासाठी दीर्घकाळ वाट पाहावी लागते. मात्र, प्रामाणिक प्रयत्नांनंतर यश निश्चित मिळते. वर नमूद केलेल्या गोष्टी क्रिकेटच्या मैदानावर ज्या क्रिकेटपटूने खऱ्या करून दाखवल्या तो क्रिकेटपटू म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज लेगस्पिनर ‘इम्रान ताहीर’. आज ताहीर ४३ व्या वर्षात पदार्पण करतोय.
लहान वयात उचलली कुटुंबाची जबाबदारी
दक्षिण आफ्रिकेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असला तरी ताहीर मूळचा पाकिस्तानचा. पाकिस्तान ते दक्षिण आफ्रिका असा त्याचा प्रवास अगदी रोमहर्षक असा आहे. लाहोर येथे त्याचा जन्म झाला. त्यांना लहानपणापासून क्रिकेटची प्रचंड आवड होती. इतर मुलांप्रमाणे तोदेखील तास-न-तास क्रिकेटच्या मैदानावर खेळत असायचा. अशातच वयाच्या १४ व्या वर्षी त्याच्या वडिलांचे निधन झाले. कुटुंबातील मोठा मुलगा असल्याने सर्व जबाबदाऱ्या ताहीरकडे आल्या. तो नजीकच्या पेस मॉलमध्ये ३००० मासिक पगाराची नोकरी करू लागला. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी ही रक्कम तोकडी होती. परंतु, तो शक्य तितके कष्ट करण्याचा प्रयत्न करत.
पाकिस्तान, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका
नोकरी करत असताना त्याची क्रिकेटची आवड देखील कमी झाली नव्हती. एक दिवस तो पाकिस्तानच्या १९ वर्षाखालील क्रिकेट संघासाठी ट्रायल देण्यासाठी गेला. आपल्या लेगस्पिनने त्याने निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले. त्याचा पाकिस्तानच्या संघात समावेश केला गेला. तो काही सामने पाकिस्तान अ संघासाठी देखील खेळला. मात्र, पाकिस्तानमध्ये अन्य दर्जेदार फिरकीपटू असल्याने त्याला पुढील स्तरावर संधी मिळाली नाही.
पाकिस्तानमध्ये आपली डाळ शिजणार नाही हे लक्षात आल्यावर त्याने इंग्लडला जाण्याचा निर्णय घेतला. तेथे तो यॉर्कशायरसाठी काउंटी क्रिकेट खेळू लागला. आर्थिक चणचण भासू लागल्यावर एका चामड्याच्या कारखान्यात तो काम करत. इंग्लंडमध्ये देखील पाकिस्तानसारखीच स्थिती असल्याने त्याने दक्षिण आफ्रिकेकडे कूच केली.
असे मिळवले दक्षिण आफ्रिकेचे नागरिकत्व
दक्षिण आफ्रिकेमध्ये आल्यावर तो सुरुवातीला जगण्यासाठी संघर्ष करत होता. काम करता करता तो क्रिकेट खेळत असे. जवळपास पाच वर्ष त्याचा हा संघर्ष चालला. तो दिवसेंदिवस देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत होता. मात्र, दक्षिण आफ्रिका संघात त्याला स्थान मिळणे कठीण होते. कारण, त्याच्याकडे तेथील नागरिकता नव्हती. सन २००६ मध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेतील सुमय्या दिलदार हिच्याशी विवाह करत दक्षिण आफ्रिकेची नागरिकता मिळवली. ही पूर्ण प्रक्रिया पार पडण्यासाठी २०११ साल उजाडावे लागले आणि त्याची दक्षिण आफ्रिकेची नागरिकता अंतिम झाली.
दैदीप्यमान आंतरराष्ट्रीय कारकीर्द
ताहीरचा २०११ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघात समावेश करण्यात आला. २०११ विश्वचषकाच्या आधी त्याची भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघात निवड केली गेली. मात्र, कर्णधार ग्रॅमी स्मिथने त्याला एकही सामना खेळवीला नाही. पुढे स्मिथने याचे स्पष्टीकरण देताना म्हटले होते की, “मला त्याला २०११ विश्वचषकात ट्रम्प कार्ड म्हणून वापरायचे होते.”
ताहीरने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत त्या विश्वचषकात १४ बळी आपल्या नावे केले. त्यानंतर मात्र त्याने मागे वळून पाहिले नाही. लवकरच त्याने दक्षिण आफ्रिकेसाठी कसोटी देखील खेळली. २०१४ टी२० विश्वचषकात तो सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता. २०१७ मध्ये तो गोलंदाजांच्या वनडे व टी२० क्रमवारीत अव्वलस्थानी पोहोचला. २०१९ क्रिकेट विश्वचषकानंतर त्याने जेपी डूमिनीसोबत वनडे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडताना तो दक्षिण आफ्रिकेच्या इतिहासातील सर्वोत्तम फिरकीपटू म्हणून निवृत्त झाला होता.
भारतीयांच्या मनात मिळवली जागा
ताहीर पाकिस्तानमध्ये जन्मला असला, इंग्लंडमध्ये राहिला असला आणि दक्षिण आफ्रिकेसाठी खेळला असला तरी त्याला सर्वाधिक प्रेम मिळाले ते भारतातून. आयपीएलमध्ये त्याने दिल्ली डेअरडेव्हिल्स व चेन्नई सुपर किंग्सचे प्रतिनिधित्व केले. वयाची चाळिशी पार केली असली तरी, आजही टी२० क्रिकेटमध्ये त्याच्या नावाचा डंका वाजतो. बळी मिळविल्यानंतर त्याच्याकडून केले जाणारे विशिष्ट सेलिब्रेशन माहीत नाही, असा एकही क्रिकेटप्रेमी मिळणार नाही. चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळत असताना त्याने आपले चाहते कैक पटीने वाढवले.
महत्त्वाच्या बातम्या –
धमाकेदार खेळीनंतर सोशल मीडियावर धोनी भाऊचीच चर्चा! चाहते आनंदात
चाळीसाव्या वर्षी धोनीची दहाड! चौकारांनी केली कमाल; उडविले मिनी हेलिकॉप्टर
IPL2022 | कोलकाताकडून CSKची धूळधाण, गतसालच्या पराभवाचा वचपा काढत हंगामात KKRची विजयी सुरुवात