पाकिस्तानचा संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौर्यावर आहे. या दौऱ्यावर ते तीन सामन्यांची वनडे मालिका खेळत असून यातील पहिला वनडे सामना शुक्रवारी (२ एप्रिल) पार पडला होता. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात पाकिस्तानने ३ गडी राखून विजय मिळवला होता. आज या दोन संघांमध्ये दुसरा वनडे सामना जोहान्सबर्ग येथे खेळवला जात आहे. या सामन्यातील एका अजब घटनेने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.
त्याचे झाले असे की, या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानने यजमान दक्षिण आफ्रिकेला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. या डावात दक्षिण आफ्रिकेच्या सलामी जोडीने शानदार सुरुवात केली होती. क्विंटन डी कॉक आणि एडिन मार्करमने पहिल्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी केली. त्यानंतर मार्करम ३९ धावा करून बाद झाला.
यानंतर कर्णधार टेंबा बवुमा फलंदाजीला आला आणि त्याने डी कॉक सह दक्षिण आफ्रिकेचा डाव सांभाळला. दुसर्या विकेटसाठी या दोघांनी शतकी भागीदारी केली. मात्र याच दरम्यान एक अजब घटना घडली. १५व्या षटकाचा चौथा चेंडू पाकिस्तानचा गोलंदाज फहीम अश्रफने अतिशय वेगाने टाकला. जवळपास १३० किलोमीटर प्रति तास या वेगाने हा चेंडू टाकलेला होता. या चेंडूने बवुमाच्या बॅटचे चक्क दोन तुकडे केले. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडीयावर व्हायरल होतो आहे.
दरम्यान, या सामन्यात पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेने ५० षटकांत तब्बल ६ बाद ३४१ धावा केल्या. कर्णधार बवुमाच्या ९२ आणि डी कॉकच्या ८० धावांचा महत्त्वाचा वाटा होता. या लक्ष्याचा पाठलाग करतांना शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा ९ षटकांत पाकिस्तानने १ बाद ५३ धावा केल्या आहेत. कर्णधार बाबर आझम १६ तर सलामीवीर फखर झमान २४ धावांवर खेळत होते.
महत्वाच्या बातम्या:
अजबच आहे हे तर! फटका चुकला, चेंडू स्टंपला लागला; पण तरीही क्विंटॉन डीकॉक नाबाद
अर्जुन तेंडुलकर आणि पृथ्वी शॉने एकत्र बसून घेतली होती २०११ विश्वचषक फायनलची मजा, फोटो होतोय व्हायरल
असे २ पाकिस्तानी खेळाडू, ज्यांना संधी मिळाली असती तर गाजवलं असतं आयपीएलचं मैदान






