न्यूझीलंडमध्ये राहून ज्या खेळाडूने ३ वर्षे पूर्ण केली असतील, न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड त्याच खेळाडूबरोबर करार करते. न्यूझीलंडचा करार मिळविण्यासाठी बाहेरच्या देशातील क्रिकेटपटूला न्यूझीलंडमध्ये ३ वर्षे राहणे बंधनकारक आहे. परंतु यावेळी न्यूझीलंडने एका धडाकेबाज खेळाडूसाठी आपला हा नियम तोडला आहे. तो खेळाडू इतर कोणी नसून दक्षिण आफ्रिकेमध्ये जन्मलेला प्रतिभावान डेव्हन कॉनवे आहे.
कॉनवेने आपल्या ३ वर्षांचा कालावधी पूर्ण करण्यापूर्वीच न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने (New Zealand Cricket Board) त्याचा करारातील खेळाडूंंच्या यादीत समावेश केला आहे. कारण मुख्य प्रशिक्षक गेविन लार्सन (Gavin Larsen) यांना वाटते की, त्याच्या उत्कृष्ट फॉर्मकडे दुर्लक्ष करणे कठीण आहे. तो फलंदाजीमध्ये चांगला पर्याय आहे. असे असले तरीही ऑगस्ट महिन्यापर्यंत २८ वर्षीय कॉनवेची संघात निवड होणार नाही. परंतु तो न्यूझीलंडच्या २० करारातील क्रिकेटपटूंमध्ये समावेश होणाऱ्या ३ नवीन खेळाडूंपैकी एक आहे.
कॉनवे (Devon Conway) सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. मागील वर्षी प्लंकेट शिल्डमध्ये वेलिंग्टन संघाकडून खेळताना त्याने कॅंटर्बरी संघाविरुद्ध खेळताना ३५२ धावा केल्या होत्या. त्यात ५ षटकार आणि ४८ चौकारांचा समावेश होता. या खेळीत एकवेळ त्याने २२२ धावा केवळ ५३ चेंडूत पूर्ण केले होते.
इतकेच नव्हे तर यावर्षी ६ जानेवारीला सुपर स्मॅशमध्ये त्याने ४९ चेंडूंमध्ये नाबाद शतकी खेळी केली होती. डावखुरा फलंदाज कॉनवे २०१७मध्ये न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाला होता. तेव्हापासून त्याने क्रिकेटच्या तिन्ही क्रिकेटप्रकारात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तसेच तो फलंदाजी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर आहे.
लार्सन म्हणाले की, कॉनवेचे मागील २ सत्रांपासून तिन्ही क्रिकेट प्रकारातीत उत्कृष्ट फॉर्मकडे दुर्लक्ष करणे कठीण होते.
डावखुरा फलंदाज कॉनवेने न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाल्यानंतर चमकदार कामगिरी करत धावांचा पाऊस पाडायला सुरुवात केली. त्याने वेलिंग्टन संघाकडून खेळताना १७ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. त्यामध्ये ७२.६३ च्या सरासरीने १५९८ धावा केल्या होत्या. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये कॅंटर्बरी संघाविरुद्ध खेळताना त्रिशतकही ठोकले होते. त्याने नाबाद ३२३ धावा केल्या होत्या. त्याच्या या खेळीनंतर असे मानले जात आहे की, येत्या ऑगस्टमध्ये त्याला न्यूझीलंड संघात सामील केले जाऊ शकते.
कॉनवे सध्या वेलिंग्टनमधील एका छोट्याश्या घरात राहतो. त्याच्याकडे एक लहान कार गाडी आहे. परंतु तो दक्षिण आफ्रिकामध्ये जेव्हा राहत होता, तेव्हा त्याचे आयुष्य व्यवस्थित होते. तो लग्झरी कार चालवत होता. तो खूप श्रीमंत होता. परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी त्याने सर्वकाही सोडले.
एका मुलाखतीत कॉनवेने खुलासा केला की, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज एबी डिविलियर्स (AB De Villiers) तसेच इंग्लंडचा कर्णधार जो रूटकडून (Joe Root) खूप काही शिकला आहे. तो या खेळाडूंंच्या चेंडू खेळण्यापूर्वीची पायाची हालचाल पाहतो. सुरुवातीला कॉनवेने विराटप्रमाणे खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला व्यवस्थित काही जमले नाही आणि त्याच्या फॉर्मवर परिणाम झाला. त्याला प्रशिक्षकाने या रणनीतीचा वापर न करण्यास सांगितले. परंतु त्याने स्वत:वर विश्वास ठेवला आणि न्यूझीलंडच्या देशांतर्गत क्रिकेटमधील स्टार फलंदाज बनून दाखविले.
भारताविरुद्धच्या मालिकेदरम्यान प्रभावी कामगिरी करणारा काईल जेमीसन (Kyle Jamieson) आणि फिरकीपटू गोलंदाज एजाज पटेललादेखील (Ajaj Patel) एलीट गटात ठेवले आहे. कॉलिन मुन्रो (Colin Munro) आणि जीत रावलला (Jeet Raval) या यादीतून वगळण्यात आले आहे. तर टॉड एस्टलने जानेवारीमध्ये निवृत्ती घेतली होती.
असे आहेत न्यूझीलंडच्या करारातील खेळाडू-
टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डेव्हन कॉनवे, कॉलिन डी ग्रँडहोम, लॉकी फर्ग्यूसन, मार्टन गप्टील, मॅट हेन्री, काईल जेमीसन, टॉम लॅथम, हेन्री निकोलस, जेम्स नीशम, एजाज पटेल, मिशेल सँटनर, इश सोधी, टीम साऊदी, रॉस टेलर, नील वॅगनर, बीजे वॉटलिंग, केन विलियम्सन, विल यंग.
ट्रेंडिंग घडामोडी-
-ड्रीम ११ अनेक पाहिल्या असतील, पण रोहित- विराटला घेऊन केलेली अशी ड्रीम ११ नक्कीच नाही
-बीसीसीआयनंतर गांगुलीची ‘दादागिरी’ चालणार आयसीसीसीत?
-एकेवेळी कापायचा क्रिकेट मैदानावरील गवत, आज नावावर आहेत ७१० विकेट्स






