आजपासुन दुबई कबड्डी मास्टर्स स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ पहिला सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. याच सामन्याने स्पर्धेला सुरवात होईल.
या स्पर्धेला सुरवात होण्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत भारताचा अष्टपैलू खेळाडू मनजीत चिल्लर बोलत होता. यावेळी त्याला कोणता संघ मजबूत वाटतो असे विचारल्यावर त्याने सांगितले की “माझ्यामते दक्षिण कोरिया मजबूत संघ वाटतो. या स्पर्धेत इराणचे काही मोठे खेळाडू खेळत नाहियेत. त्याच्या तुलनेत कोरियाकडे काही अनुभवी खेळाडू आहेत, जे प्रो-कबड्डीमध्येही खेळले आहेत.”
कोरिया संघात जॅन्ग कुंग ली हा चांगला रेडर आहे. तसेच इओम ताई देओक हा अष्टपैलू खेळाडू आहे. त्याचबरोबर त्यांच्या बचाव फळीत किम सोंग रेओल, को याँग चाँग अशी मोठी नावे आहेत.
या स्पर्धेत भारतासह पाकिस्तान, इराण, कोरिया, केनिया आणि अर्जेंटीना या देशांचे संघ सहभागी होणार आहेत.
तसेच या स्पर्धेसाठी संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. यात भारत अ गटात असुन पाकिस्तान आणि केनिया हे दोन देशही या गटात असणार आहेत. तसेच ब गटातून इराण, दक्षिण कोरिया आणि अर्जेंटीना खेळतील.
या स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा अजय ठाकूरकडे सोपविण्यात आली आहे.
ही स्पर्धा 22 जून ते 30 जून दरम्यान होणार आहे. तसेच या स्पर्धेकडे एशियन गेम्सची रंगीत तालिम म्हणून पाहिले जात आहे.
कबड्डीच्या अन्य महत्त्वाच्या बातम्या-
–दुबई कबड्डी मास्टर्स स्पर्धेसाठी राज्यवर्धनसिंग राठोड असणार प्रमुख पाहुणे
–आज भारत-पाकिस्तान सामन्याने सुरु होणार दुबई कबड्डी मास्टर्स स्पर्धा