काल रात्री क्रोएशिया येथे पार पडलेल्या युरो चॅम्पियनशिपच्या अंडर १७च्या सामन्यात इंग्लंडला हरवून स्पेन विक्रमी तिसऱ्या वेळेस विजेता ठरला.पूर्ण वेळेत २-२ बरोबरी झाल्याने सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊट मध्ये झाला, त्यात ४-१ ने स्पेनने बाजी मारली. रेकॉर्ड ३ वेळा विजेतेपद पटकावत स्पेन ठरला युरोपचा चॅम्पियन.
विजेतेपदाचा प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या इंग्लंडने सुरुवातीपासून सामन्यावर मजबूत पकड घेतली आणि सामन्याच्या १८व्या मिनिटाला हडसन-ओडोई याने गोल करत इंग्लंडला आघाडी मिळवून दिली. पहिला हाफ संपण्याच्या अगोदर दोन मिनिटे शिल्लक असताना स्पेनच्या मोरेने ३८व्या मिनिटाला गोल करत स्कोर लाइन १-१ असा बरोबरीत आणली. अंडर १७च्या नियमानुसार सामना हा ८० मिनिटांचा तर दोन्ही हाफ ४०-४० मिनिटांचे खेळवले जातात.
दुसऱ्या हाफमध्ये परत इंग्लंडने आक्रमणे वाढवली आणि त्याचे फळ म्हणून त्यांनी सामन्यातील दुसरा गोल ५८व्या मिनिटाला केला.सामन्यात बढत मिळवून देणारा गोल फोडेन याने मारला होता.सामन्यात २-१ अशी शेवट पर्यंत बढत टिकवून ठेवण्यात त्यांना यश मिळाले पण एक्सट्रा टाइममध्ये बदली खेळाडू म्हणून आलेल्या स्पेनच्या दियाझने हेडरने ८०+६व्या मिनिटाला गोल करत सामना २-२ असा बरोबरीत आणला. सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊट वर होणार होता.
२०१६-१७च्या १२ सामन्यात अपराजित असणारा इंग्लंडचा संघ गोल जाळीचे अचूक वेध घेऊ शकले नाहीत आणि स्पेनने हा सामना ४-१ अश्या फरकाने जिंकला. मागील ६ पैकी ५ वेळाअंतिम सामन्याचा निकाल हा पेनल्टी शूटआऊट मध्ये लागला आहे. २००७ आणि २००८ मध्ये विजेता असणारा स्पेनचा संघ हा विक्रमी तिसऱ्या वेळा विजेता ठरला. इंग्लने २०१० आणि २०१४ साली हा चषक जिंकला होता.
या स्पर्धेतील अंतिम ५ संघ हे भारतात होणाऱ्या फिफा अंडर १७च्या वल्डकपसाठी थेट पात्र ठरणार आहेत. पात्र ठरलेल्या संघांची नावे खालील प्रमाणे:
१. स्पेन
२. इंग्लंड
३. जर्मनी
४. तुर्की
५. फ्रान्स