स्पेनने शुक्रवारी (३ जुलै) फिफा विश्वचषक २०२६ च्या राऊंड ऑफ ३२ मध्ये ऑस्ट्रियाविरुद्ध ३-० असा एकतर्फी विजय मिळवला आणि उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले. या मोठ्या विजयाबरोबर स्पेनने एक ऐतिहासिक विक्रमही रचला. स्पेनचा गोलकीपर उनाई सिमॉन (Unai Simon) याने विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक वेळ एकही गोल न होत खेळण्याचा (सर्वाधिक वेळ क्लीन शीट राखण्याचा) ३६ वर्षांचा जुना विक्रम मोडला.
सिमॉनने या स्पर्धेत साखळी फेरीपासून लयीत असून त्याने बाद फेरीत त्याच्या कामगिरीमध्ये सातत्य राखले आहे. त्याने या स्पर्धेत सलग चौथ्यांदा क्लीन शीट राखत फुटबॉलच्या इतिहासात आपले नाव सुवर्ण अक्षराने कोरले. त्याने ५१९ मिनिटांमध्ये एकही गोल न खाता गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव समाविष्ट केले आहे.
ही विक्रमी कामगिरी करताना सिमॉनने इटलीचे दिग्गज गोलकीपर वॉल्टर झेंगा यांना मागे टाकले. त्यांनी १९९० च्या फिफा विश्वचषकात ५१७ मिनिटे क्लीन शीट राखली होती. त्यांनी सलग पाच सामन्यांमध्ये प्रतिस्पर्ध्याला गोल करण्यापासून रोखले होते. (record for most consecutive minutes without conceding a goal in FIFA World Cup)
सिमॉनने २०२२ विश्वचषकाच्या गट फेरीतील शेवटची ३९ मिनिटे आणि ‘राऊंड ऑफ १६’ मधील १२० मिनिटे असे एकूण १५९ मिनिटे क्लीन शीट राखली. आता त्याने २०२६ विश्वचषकात केप वर्दे, सौदी अरेबिया, उरुग्वे आणि ऑस्ट्रिया यांच्याविरुद्ध सलग ‘क्लीन शीट्स’ राखत त्यामध्ये आणखी ३६० मिनिटांची भर घातली.
लॉस एजेंलिस स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सिमॉनने ऑस्ट्रियाविरुद्धच्या दुसऱ्या हाफच्या सुरूवातीला स्पेनच्या दिग्गज गोलकीपर्सपैकी एक असलेल्या इकर कॅसिलासचा विक्रम मोडला. २०१० आणि २०१४ च्या विश्वचषकांदरम्यान स्पेनसाठी सर्वाधिक काळ क्लीन शीट राखण्याचा विक्रम कॅसिलाच्या नावावर होता.
ऑस्ट्रियाचा एकही गोल ‘शॉट ऑन टारगेट’ गेला नाही, त्यामुळे सिमॉनला बचाव करण्याची आवश्यकताच पडली नाही. या स्पर्धेत स्पेनविरुद्ध विरोधी संघांना केवळ चार अचूक शॉट्स मारता आले आहेत.
स्पेनमध्ये गोलकीपर्सच्या जागांसाठी इतकी प्रचंड स्पर्धा आहे की युरोपमधील दोन मोठ्या क्लबच्या चॅम्पियन गोलकीपर्संना बाकावर बसावे लागत आहे. संघात अनेक अनुभवी खेळाडू असूनही प्रशिक्षक लुईस दे ला फुएंते यांचा सिमॉनवर विश्वास आहे.
या स्पर्धेत स्पेनचा पुढील सामना पोर्तुगालशी आहे, जो ७ जुलैला खेळला जाईल.






