---Advertisement---

स्पेनच्या वर्ल्डकप विजयाच्या आनंदावर विरजण; जल्लोषादरम्यान अपघातात 13 वर्षांच्या मुलाचा मृत्यू!

On: सोमवार, जुलै 20, 2026 10:03 PM
---Advertisement---

स्पेनने १६ वर्षांच्या मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेरीस फिफा विश्वचषकावर पुन्हा एकदा आपलं नाव कोरलं. गतविजेत्या अर्जेंटिनाचा पराभव करत स्पेनने वर्ल्डकपवर नाव इतिहास घडवला. मात्र, या जल्लोषाला गालबोट लागलं. विजयानंतर सोमवारी पहाटे सुरू असलेल्या जल्लोषादरम्यान एका मोठ्या कारंज्याचा काही भाग कोसळल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. या दुर्दैवी घटनेमुळे स्पेनच्या विश्वविजेतेपदाच्या आनंदावर शोककळा पसरली.

ही घटना सोमवारी मध्यरात्रीनंतर पश्चिम स्पेनमधील सलामांका प्रांतातील सिउदाद रोड्रिगो शहरातील ऐतिहासिक आर्बोल गोर्डो (Arbol Gordo) कारंज्याजवळ घडली. पोर्तुगालच्या सीमेपासून जवळ हे शहर वसलेलं आहे. स्पेनने फिफा विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाचा अतिरिक्त वेळेत १-० असा पराभव करून २०१० नंतर पहिल्यांदाच आणि एकूण दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद जिंकल्याचा जल्लोष करण्यासाठी शेकडो चाहते जमले होते.

मात्र, जल्लोष सुरू असतानाच या ऐतिहासिक कारंज्याचा वरचा भाग अचानक कोसळून खाली उभ्या असलेल्या चाहत्यांवर पडला. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, या दुर्घटनेत १३ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. या दुर्दैवी घटनेमुळे स्पेनच्या विश्वविजेतेपदाच्या आनंदाला गालबोट लागलं आहे.

सिउदाद रोड्रिगो नगरपरिषदेने अधिकृत निवेदन जारी करत या दुर्दैवी घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. मृत मुलाच्या कुटुंबीयांप्रती आणि मित्रपरिवाराप्रती संवेदना व्यक्त करत नगरपरिषदेने संपूर्ण शहर या दुःखात सहभागी असल्याचं म्हटलं. नगरपरिषदेच्या निवेदनात म्हटलं आहे, “या दुःखद घटनेमुळे संपूर्ण शहर शोकाकुल आहे. मृत अल्पवयीन मुलाच्या कुटुंबीयांच्या आणि मित्रांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. स्पेनच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाच्या विश्वचषक विजयाचा जल्लोष करण्याचा हा क्षण होता, मात्र त्याचं रूपांतर एका भीषण शोकांतिकेत झालं.”

स्पेनने अमेरिकेतील न्यूयॉर्क-न्यू जर्सी स्टेडियममध्ये झालेल्या फिफा विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाचा अतिरिक्त वेळेत १-० असा पराभव करत तब्बल १६ वर्षांनंतर पुन्हा विश्वविजेतेपदावर नाव कोरलं. २०१० नंतर स्पेनचं हे दुसरं फिफा विश्वचषक विजेतेपद ठरलं. सामन्याचा नायक ठरला फेरान टोरेस. बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या टोरेसने अतिरिक्त वेळेच्या १०६व्या मिनिटाला निर्णायक गोल करत स्पेनला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. त्याच्या या गोलमुळे स्पेनने अर्जेंटिनाचं विश्वविजेतेपद हिरावून घेत पुन्हा एकदा फुटबॉल विश्वावर आपलं अधिराज्य सिद्ध केलं.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---