स्पेनचा स्टार टेनिसपटू कार्लोस अल्कारेझ यानं फ्रेंच ओपन 2024 च्या पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. रविवारी (9 जून) खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात तिसऱ्या मानांकित अल्कारेझनं चौथ्या मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्हचा 6-3, 2-6, 5-7, 6-1, 6-2 असा पराभव केला. जर्मन खेळाडू झ्वेरेव दुसऱ्यांदा ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. याआधी त्यानं 2020 यूएस ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली होती.
21 वर्षीय कार्लोस अल्कारेझच्या कारकिर्दीतील हे तिसरं ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. यापूर्वी 2022 मध्ये अल्कारेझनं नॉर्वेच्या कॅस्पर रुडचा पराभव करून यूएस ओपनचं विजेतेपद पटकावलं होतं. तर 2023 मध्ये त्यानं दिग्गज नोव्हाक जोकोविचला पराभूत करून विम्बल्डनचं विजेतेपद जिंकलं होतं.
अंतिम सामन्याचा पहिला सेट पूर्णपणे अल्कारेझच्या नावे होता. या सेटमध्ये झ्वेरेव्ह केवळ तीन गेम जिंकण्यात यशस्वी झाला. त्यानंतर झ्वेरेव्हनं दुसऱ्या सेटमध्ये शानदार पुनरागमन करत हा सेट 6-2 असा जिंकला. यानंतर झ्वेरेवनं तिसरा सेटही जिंकून 2-1 अशी आघाडी घेतली. यानंतर अल्कारेझनं उत्कृष्ट पुनरागमन करत सलग दोन सेट जिंकून विजेतेपद पटकावलं.
अल्कारेझचा झ्वेरेवविरुद्ध 10 सामन्यांमधील हा पाचवा विजय आहे. आता तो त्याच्याच देशाच्या दिग्गज राफेल नदालला मागे टाकून 3 वेगवेगळ्या कोर्ट्सवर ग्रॅन्डस्लॅम जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू बनला आहे. नदालनं ही कामगिरी केली तेव्हा तो अल्कारेझपेक्षा दीड वर्षांनी मोठा होता.
2004 नंतरची ही पहिलीच फ्रेंच ओपन फायनल आहे, ज्यात राफेल नदाल, नोव्हाक जोकोविच किंवा रॉजर फेडरर हे तीन दिग्गज खेळाडू खेळत नव्हते. अल्कारेझने उपांत्य फेरीच्या लढतीत इटलीच्या यानिक सिनरचा 2-6, 6-3, 3-6, 6-4, 6-3 असा पराभव केला. तर अलेक्झांडर झ्वेरेव्हनं उपांत्य फेरीत नॉर्वेच्या कॅस्पर रुडचा 2-6, 6-2, 6-4, 6-2 असा पराभव केला होता.
महिला एकेरीत स्विटेक ठरली चॅम्पियन
फ्रेंच ओपनच्या महिला एकेरीत पोलंडची इंगा स्विटेक चॅम्पियन ठरली. अंतिम सामन्यात स्विटेकनं इटलीच्या जास्मिन पाओलिनीचा 6-2, 6-1 असा पराभव केला. इंगा स्विटेकचं हे चौथं फ्रेंच ओपन आणि एकूण पाचवं ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. तर 12वी मानांकित जास्मिन पहिल्यांदाच एखाद्या ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत पोहोचली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
टीम इंडियाचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धोबीपछाड! गोलंदाजांची अविश्वसनीय कामगिरी
48 चेंडूत 48 धावा हव्या होत्या, 8 गडी बाकी होते; तरीही पाकिस्तानचा पराभव! भारतीय गोलंदाजांनी असा फिरवला सामना
पाकिस्तानच्या पराभवानंतर ढसाढसा रडला नसीम शाह, मैदानावरचा व्हिडिओ व्हायरल