प्रत्येक खेळाडूची इच्छा असते की, आपल्याला लवकरात लवकर चांगली संपत्ती मिळो, आपले नाव होवो, लोकांनी आपल्याला ओळखायला हवे. प्रत्येक जण हेच स्वप्न घेऊन आयुष्यात वाटचाल करत असतो. क्रिकेटपटू ही याला अपवाद नसतात. काही क्रिकेटपटूंची उभी हयात चांगले नाव आणि संपत्ती मिळवण्यात जाते. सध्याच्या टी२० क्रिकेटच्या जमान्यात खेळाडू रातोरात नाव कमावू लागले आहेत. मात्र, टी२० क्रिकेट येण्याआधी अशी परिस्थिती नव्हती. खेळाडू अनेक वर्ष मेहनत केल्यानंतर, प्रसिद्धीझोतात यायचे. काही खेळाडू तर, संपूर्ण कारकिर्दीत चांगली कामगिरी करून देखील लोकांच्या नजरेत येत नव्हते. अशावेळी, २००२-२००३ च्या दरम्यान असा एक तरुण भारतीय क्रिकेटपटू पुढे आला ज्याने, खूप लवकर प्रगती करत नाव, पैसा आणि प्रसिद्धी कमावली. भारतासाठी तो अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळत होता. कोणी त्याला पुढचा कपिल म्हणत तर कोणी बोथम. मात्र, हा क्रिकेटपटू क्रिकेटच्या क्षितिजावर जितक्या वेगाने येऊन चमकला, तितक्याच वेगाने गायब देखील झाला. आज त्याच क्रिकेटपटूचा वाढदिवस. इरफान पठाणचा वाढदिवस.
मशिदीत सफाई करून चालायचा कुटूंबाचा उदरनिर्वाह
इरफानचा जन्म वडोदर्यातील मांडवी या ठिकाणी झाला. घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची. त्याचे वडील मेहबूब हे घराशेजारील मशिदीच्या साफसफाईचे काम करत. मशिदीच्या कामानंतर, त्याच मशिदी बाहेर ते अत्तराची गाडी लावत. मेहबूब यांची दोन्ही मुले युसुफ आणि इरफान त्यांना या कामी मदत करायची. दोन्ही मुलांना क्रिकेटची खूप आवड होती. ते दोघे आसपासच्या इतर मुलांसोबत मशिदीच्या आवारात क्रिकेट खेळत राहायचे. क्रिकेट किट नसले तरी, हे दोघे भाऊ सतत मैदानावरच असायचे.
दत्ता गायकवाड यांची मदत आणि…
इरफानच्या आयुष्यात, एक व्यक्ती देवदुताप्रमाणे आले. ते व्यक्ती होते भारतीय संघाचे माजी खेळाडू दत्ता गायकवाड. गायकवाड यांनी इरफानची स्विंग गोलंदाजी आणि उपयोगी फलंदाजी पाहून त्याला बडोद्याच्या पंधरा वर्षाखालील क्रिकेट संघात स्थान दिले. त्याचवेळी इरफानने पहिल्यांदा क्रिकेट किट अंगावर चढवली. इरफानने १९९७ मध्ये वयाच्या, तेराव्या वर्षी बडोद्याच्या सोळा वर्षाखालील संघात जागा बनवली. पुढील दोन वर्षात त्याची निवड बडोद्याच्या एकोणीस वर्षांखालील संघात झाली होती. इरफान बडोद्याच्या एकोणीस वर्षाखालील संघात खेळत असला तरी, १९९९ मध्ये त्याला भारताच्या १६ वर्षाखालील संघात संधी देण्यात आली. भारताच्या संघाकडून त्याने १० सामने खेळत १५ बळी आपल्या नावे केले. वयोगट स्पर्धांमध्ये आपल्या अष्टपैलू कामगिरीने तो सर्वांच्या नजरेत भरत होता.
इरफानच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट
इरफानसाठी २००३ हे वर्ष आयुष्याचे टर्निंग पॉइंट ठरले. भारताच्या एकोणीस वर्षाखालील क्रिकेट संघात खेळताना त्याने, ‘युवा आशिया चषक’ स्पर्धेत सर्वाधिक १८ बळी मिळवून मालिकावीराचा किताब आपल्या नावे केला. याच स्पर्धेत, बांगलादेशविरुद्ध त्याने सोळा धावा देत नऊ गडी बाद केले. या कामगिरीनंतर, निवड समिती त्याला भारतीय संघात संधी देण्यासाठी रस घेऊ लागली.
एकोणिसाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण
आत्तापर्यंत केलेल्या मेहनतीचे फळ इरफानला सन २००३ च्या अखेरीस मिळाले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय कसोटी संघात त्याला स्थान मिळाले होते. ऍडलेड कसोटीत त्याने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा तो सर्वात तरुण भारतीय वेगवान गोलंदाज होता. कसोटी मालिकेनंतर, लगेच होणाऱ्या एकदिवसीय तिरंगी मालिकेसाठी त्याची निवड झाली. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात त्याने चार बळी घेत, जोरदार कामगिरी केली. मालिकेत १८ बळी टिपत तो मालिकेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला.
‘कराची किंग’ इरफान पठाण
भारतीय संघात सातत्याने खेळत तो संघाचा नियमित सदस्य बनला. जहीर खाननंतर भारताचा सर्वात विश्वासू वेगवान गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिले जात. इरफानच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्षण म्हणता येईल, अशी गोष्ट २००६ पाकिस्तान दौ-यावर घडली. कराची कसोटीच्या पहिल्या दिवशी, पहिले षटक टाकतानाच शेवटच्या तीन चेंडूंवर सलमान बट, युनूस खान आणि मोहम्मद युसुफ यांना बाद करत त्याने हॅट्रिक मिळवली. कसोटीच्या आजवरच्या इतिहासात अशी कामगिरी फक्त एकट्या इरफानच्या नावे आहे. या हॅट्रिकमुळे, त्याला ‘कराची किंग’ या टोपण नावाने ओळखले जाऊ लागले.
ग्रेग चॅपल यांना वाटत होते इरफानने व्हावे मोठा ‘ऑलराऊंडर’
याच दरम्यान, भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून ग्रेग चॅपल यांनी जबाबदारी स्वीकारली. ते इरफानला एक अष्टपैलू खेळाडू समोर आणण्याचा प्रयत्न करत होते. चॅपल सातत्याने भारतीय संघासोबत वेगवेगळे प्रयोग करत होते. चॅपल यांनी फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करायला लावल्यामुळे, इरफानच्या गोलंदाजीची धार काहीशी बोथट झाली. चॅपल यानी इरफानला सलामीवीर देखील बनवले होते. या सर्वांचा परिणाम म्हणून, इरफान आयसीसीच्या गोलंदाजी क्रमवारीतून बाहेर पडला. संघातील त्याचे स्थानही डळमळीत झाले. परंतू आपल्या कारकिर्दीत जे काही नुकसान झाले, ते चॅपेल यांच्यामुळे झाले नसल्याचे पुढे एकदा इरफान बोलला होता.
टी२० विश्वचषक फायनलचा सामनावीर
वेस्ट इंडीजमध्ये झालेल्या २००७ क्रिकेट विश्वचषकात भारतीय संघाला लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. इरफान त्या संघाचा भाग होता. याचवर्षी, प्रथमच झालेल्या टी२० विश्वचषकात तो भारतीय संघाचा सदस्य झाला. यावेळी, त्याचा मोठा भाऊ यूसूफ देखील संघात होता. अंतिम सामन्यात तीन बळी मिळवत, भारताला विश्वविजेते करण्यात त्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर घोषित करण्यात आले. विश्वचषक विजयानंतर इरफानने, भारताच्या एकदिवसीय व कसोटी संघात पुनरागमन केले. पुनरागमन केले असले तरी, त्याचा खेळ पहिल्यासारखा राहिला नव्हता. तो संघाच्या सतत आत-बाहेर होऊ लागला. याकाळात त्याच्याकडून, एखाद दुसरी चांगली खेळी पाहायला मिळत.
आपला मोठा भाऊ युसुफ पठाणसोबत मिळून श्रीलंकेविरुद्ध टी२० सामन्यात ज्याप्रकारे त्याने भारताला विजयी करून दिले होते, तो सामना भारतीय क्रिकेट चाहते कधीही विसरणार नाहीत.
चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या संघाचा सदस्य
इरफानने २००८ म्हणजे आपला अखेरचा कसोटी तर, अखेरचा एकदिवसीय व टी२० सामना २०१२ मध्ये खेळला. भारतीय संघाने जिंकलेल्या २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी संघात तो सामील होता. मात्र, त्याला स्पर्धेत एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यानंतर त्याची कधीही भारतीय संघात निवड झाली नाही. राष्ट्रीय संघात खेळायला मिळत नसले तरी, त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळणे चालू ठेवले होते. याच दरम्यान तो आयपीएलमध्ये सुरुवातीला किंग्ज इलेव्हन पंजाब, त्यानंतर दिल्ली डेअरडेव्हिल्स, सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई सुपर किंग्स, रायझिंग पुणे सुपरजायंट व गुजरात लायन्स या संघांकडून खेळला.
३५ व्या वर्षी घेतली निवृत्ती
देशांतर्गत क्रिकेटमधील ढासळती कामगिरी तसेच फिटनेसचे कारण सांगून जानेवारी २०२० मध्ये त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. गेली काही वर्ष तो भाऊ यूसूफ पठाणसोबत मिळून ‘क्रिकेट ॲकॅडमी ऑफ पठाण’ ही क्रिकेट अकादमी भारतभर चालवतो. त्याने काही काळ जम्मू-काश्मीर रणजी संघाचा सल्लागार म्हणून देखील काम पाहिले. सध्या तो एक उत्कृष्ट समालोचक म्हणून आपली जबाबदारी पार पाडत आहे. कोरोना व्हायरस दरम्यान लॉकडाऊन सुरु असताना या भावांनी अनेक समाजपयोगी कामे केली.
इरफानच्या आकड्यांवर नजर टाकली तर त्याचे आकडे अत्यंत प्रभावी दिसतात. इरफानने भारतासाठी २९ कसोटीत १०० तर १२० वनडेमध्ये १७८ बळी आपल्या नावे केले. २४ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात २८ बळी मिळवले.
भारतीय क्रिकेटमधील अनेक ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार राहिलेला, भारताला बरेच दिमाखदार विजय मिळवून दिलेला इरफान पठाण खूप जादा अपेक्षांच्या ओझ्याखाली दबला गेला. एखाद-दुसऱ्या अपयशानंतर पुन्हा संधी न दिली गेल्याने भारतीय क्रिकेटचा हा गंधर्व कायम शापित राहिला.
महत्त्वाच्या बातम्या –
वॉर्नरच्या आईने ‘तो’ एक निर्णय बदलला नसता तर जगाला दिग्गज क्रिकेटपटू मिळाला नसता!
वाढदिवस विशेष: कसोटी सामन्याच्या पहिल्या षटकात हॅट्रिक घेणारा एकमेव अवलिया, पाहा व्हिडीओ
गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण