जगातील सर्वात प्रसिद्ध खेळ फुटबॉल असला तरी, क्रिकेटचे मर्यादित देशांचे एक मोठे विश्व आहे. क्रिकेट ज्या-ज्या देशांमध्ये खेळले जाते; त्या-त्या देशात क्रिकेटबद्दल प्रचंड प्रेम आणि उत्साह असलेला आपल्याला दिसतो. भारतीय उपखंडात तर क्रिकेटला धर्माचा दर्जा दिला गेलेला आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियातदेखील क्रिकेटपटू आणि कर्णधार यांना एक वेगळा मानसन्मान असलेला आपल्याला पहायला मिळतो. त्याचप्रकारे, कॅरेबियन बेटांवर देखील क्रिकेटचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. कॅरेबियन बेटांवर सुरुवातीला विरंगुळा म्हणून खेळले जाणारे क्रिकेट आज तेथील लोकांचा सर्वात आवडता खेळ आहे. सात-आठ देशांचा मिळून एकच वेस्ट इंडीज क्रिकेट संघ क्रिकेट खेळतो. या सर्व देशातून अगदी निवडून काही दर्जेदार खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळतात. असाच एक क्रिकेटपटू अत्यंत मोठी प्रसिद्धी मिळवत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दाखल झाला. मात्र, सुरुवातीचे वर्ष गाजवल्यानंतर तो तितक्याच वेगाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाजूला फेकला गेला. अफाट प्रतिभा असलेला, तो वेस्ट इंडिजचा लेगस्पिनर म्हणजे देवेंद्र बिशू.
गयानाच्या दर्जेदार क्रिकेटपटूंच्या परंपरेतील खेळाडू
कॅरेबियन बेटांवरील गयाना या देशात भारतीय वंशाचे लोक पहायला मिळतात. अशाच एका भारतीय वंशाच्या कुटुंबात बिशूचा जन्म झाला. गयानाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला जे दर्जेदार खेळाडू दिले; त्यामध्ये रोहन कन्हाय, लान्स गिब्स, क्लाइव्ह लॉईड, शिवनारायण चंद्रपॉल या दिग्गजांचा समावेश होतो. त्याच दिग्गजांचा परंपरेत बिशू सामील होणार असे सर्वांना वाटत. कारण, वेस्ट इंडीजने आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घ्यावी, असा एकही लेगस्पिनर निर्माण केला नव्हता. वेस्ट इंडीजमध्ये अभावाने दिसणारी लेगस्पिनची कला बिशूकडे होती. बिशूच्या वडिलांची इच्छा होती की, त्यांच्या मुलाने एक दिवस वेस्ट इंडीजचे प्रतिनिधित्व करावे.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये देखणी कामगिरी
वेस्टइंडीज क्रिकेट वर्तुळात बिशूचे नाव २००८ च्या हंगामात पुढे आले. तो संपूर्ण हंगामातील प्रत्येक सामन्यात चार-पाच बळी नियमितपणे घेत होता. २००९ च्या देशांतर्गत हंगामात त्याने प्रथमश्रेणी सामन्यात १० बळी मिळवून, सर्वांचे लक्ष खेचून घेतले. २०१० च्या कॅरेबियन टी२० लीगमध्ये त्याने गयानाचे प्रतिनिधित्व करताना चमकदार कामगिरी केली. स्पर्धेतील चार सामन्यात ५.१० च्या चांगल्या सरासरीने त्याने १० बळी आपल्या नावावर केले. या स्पर्धेतील कामगिरीमुळे त्याला वेस्ट इंडीज अ संघात स्थान मिळाले.
विश्वचषकातून आंतरराष्ट्रीय पदार्पण
बिशू देशांतर्गत स्पर्धेत चांगली कामगिरी करत असताना २०११ चा क्रिकेट विश्वचषक भारतीय उपखंडात होत होता. स्पर्धेच्या मध्यात अष्टपैलू ड्वेन ब्रावो दुखापतग्रस्त झाल्याने बिशूला त्याचा बदली खेळाडू म्हणून बोलावून घेण्यात आले. उपखंडातील फिरकीला मदतगार खेळपट्ट्यांवर बिशू यशस्वी ठरेल; अशी अपेक्षा वेस्ट इंडीज संघ व्यवस्थापनाने ठेवली होती. इंग्लंडविरुद्धच्या साखळी सामन्याद्वारे त्याने आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. पहिल्याच सामन्यात आपल्या वैविध्यपूर्ण गोलंदाजीने त्यांनी सर्वांची मने जिंकली. या सामन्यात आपल्या दहा षटकांच्या स्पेलमध्ये त्याने ३४ धावा देऊन ३ फलंदाजांना तंबूत पाठवले. विश्वचषकानंतर, वेस्ट इंडीज दौऱ्यावर आलेल्या पाकिस्तानविरुद्ध त्याने कसोटी आणि टी२० मध्ये देखील पदार्पण केले. पहिल्याच टी२० सामन्यात ४ बळी मिळवून, तो चर्चेचा विषय बनला होता.
आयसीसीचा २०११ वर्षातील सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपल्या पहिल्याच वर्षात बिशूने जबरदस्त लोकप्रियता मिळवली. त्याच्या कामगिरीचा त्यात महत्त्वाचा वाटा होता. बिशूला २०११ या वर्षी आयसीसीचा ‘वर्षातील सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू’ हा पुरस्कार मिळाला. सोबतच, बार्बिक क्रिकेट संघाने ‘मदर ऑफ द इयर’ हा पुरस्कार देऊन त्याला सन्मानित केले.
सातत्याचा अभाव आणि सुनील नरीनचे आगमन
बिशूला २०११ या वर्षातील कामगिरी पुढील वर्षी करता आली नाही. त्याच सुमारास वेस्ट इंडीज संघात सुनील नरीन आणि शेन शिलिंगफोर्ड यांचे आगमन झाले होते. बिशू संघात सामील होता. मात्र, नरीनमुळे त्याला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये संधी मिळत नव्हती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत अवघा एक बळी मिळाल्याने त्याला संघातून डच्चू देण्यात आला. शानदार सुरुवात केल्यानंतर त्याला बराच काळ संघातून बाहेर बसावे लागले.
‘बॉल ऑफ द सेंचुरी’ टाकत उडवली हॅडिनची दांडी
राष्ट्रीय संघातून बराच काळ बाहेर राहिल्यानंतर २०१३ च्या सुरुवातीला त्याने पाकिस्तानचा माजी लेगस्पिनर सकलेन मुश्ताक याच्याकडून गोलंदाजीचे धडे घेतले. २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय पुनरागमनाचे श्रेय त्याने सकलेन मुश्ताकला दिले. पुनरागमनानंतर, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या डॉमिनिका कसोटी ब्रॅड हॅडिनला बाद करताना टाकलेला चेंडू ”बॉल ऑफ द सेंचुरी’ म्हणून ओळखला जातो. हा चेंडू शेन वॉर्नने माईक गॅटींगला बाद करताना टाकलेल्या चेंडूच्या बरोबरीचा समजला गेला. मजेशीर बाब म्हणजे शेन वॉर्नने तो चेंडू २२ वर्षापूर्वी ५ जून याच दिवशी टाकला होता.
सीपीएलच्या अंतिम फेरीत नाही करू शकला गयानाला विजयी
कॅरेबियन प्रिमियर लीगच्या २०१५ हंगामात त्याने उत्कृष्ट कामगिरी केलेली. गयाना अमेझॉन वॉरियर्स संघाला स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत नेण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावलेली. अंतिम फेरीतील शेवटचे षटक टाकण्याची जबाबदारी बिशूवर होती. त्रिनिदाद आणि टोबॅगो संघाला अंतिम षटकात विजयासाठी ५ धावांची आवश्यकता होती. बिशूने पहिल्या चार चेंडूंवर अवघ्या तीन धावा दिल्या होत्या. मात्र, पाचवा चेंडू त्याच्याकडून नोबॉल पडला. त्यानंतर, फ्रि-हीटवर केविन कूपरने षटकार मारत त्रिनिदाद आणि टोबॅगोला विजयी केले. बिशूला आजही त्या घटनेचे दुःख होते.
कसोटी क्रिकेटमध्ये बनला वेस्ट इंडीजचा प्रमुख फिरकीपटू
बिशूने २०१६ मध्ये पाकिस्तानविरुद्ध दुबई कसोटीत दहा बळी मिळवण्याची कामगिरी केली. बिशू हा दिवस-रात्र कसोटीत दहा बळी मिळवणारा पहिला गोलंदाज आहे. २०१८-२०१९ पासून तो वेस्ट इंडीजच्या कसोटी संघाचा नियमित सदस्य आहे. बिशूने आतापर्यंत ३६ कसोटीत ११७ बळी आपल्या नावे केले आहेत. बिशूने ४० एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीजचे प्रतिनिधित्व करताना ३८ फलंदाजांना बाद केले.
भारतात घेतला होता आपल्या घराण्याचा शोध
बिशू भारत दौऱ्यावर आला असता, आपल्या घराण्याचे मूळ शोधण्याचा प्रयत्न करत होता. त्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, “आमचे कुटुंब कदाचित गुजरातमधील आहे. आमच्या पंडितांनी सांगितले होते की, तुमच्यासारखी नावे गुजरातच्या राजकोट शहरात दिसून येतात. माझी आजी भारतातील परंपरा जोपासण्याचा प्रयत्न करायची. तिला मी अनेकदा उपवास आणि देवपूजा करताना पाहिले आहे.”
सातत्याचा अभाव आणि सुनील नरीनसारख्या रहस्यमयी गोलंदाजाविरुध्द स्पर्धा करावी लागल्याने, कारकीर्दीची चांगली सुरुवात होऊनही बिशूला आपले नाव करता आले नाही. अफाट प्रतिभा असूनही तो आपल्या प्रतिभेला आंतरराष्ट्रीय पातळीवर न्याय देऊ शकला नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
शेवटी त्याने इंग्लंडला विश्वविजेते बनविलेच! कहाणी ‘बिग बेन’ ची