मे 23, 2003, लॉर्ड्सचे मैदान. इंग्लंड आणि झिम्बाब्वे संघांमधली मालिकेतली पहिली कसोटी. इंग्लंडचा पहिल्या डावात 472 धावांचा डोंगर. गोलंदाजीसाठी इंग्लंडचा संघ मैदानात उतरला. पॅव्हेलियन एंडकडून मॅथ्यू होगार्डनं पहिले षटक टाकले. आणि त्यानंतर नर्सरी एंडकडे सगळ्यांच्या नजरा वळल्या. 6 फूट 2 इंच उंचीचा आणि अवघ्या 21 वर्षांचा लॅन्केशायरमधून इंग्लंडच्या संघात आलेला हा गोलंदाज कसोटी क्रिकेटमधला पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाला. तो होता ‘जेम्स मायकल अँडरसन’.
लॉर्ड्स कसोटीच्या त्या पहिल्याच डावात अँडरसनने झिम्बाब्वेचा निम्मा संघ तंबूत धाडला. त्या कामगिरीने त्याने पहिल्याच कसोटीत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. अँडरसनची पदार्पणातली ही कामगिरी फक्त एक नांदी होती, एका नव्या युगाची. तो उदय होता वेगवान गोलंदाजांच्या दुनियेतल्या एका नव्या शिलेदाराचा. हा तोच काळ होता जेव्हा नव्वदीच्या दशकातले स्विंगचे बादशाह वासिम अक्रम, वकार युनूस निवृत्तीच्या उंबरठ्यावर होते आणि त्याचवेळी जणू त्यांचाच वारसा पुढे नेण्यासाठी कसोटी क्रिकेटमध्ये अँडरसन पर्वाची सुरुवात झाली होती.
लॉर्डसच्या त्या कसोटीपासून सुरु झालेला अँडरसनचा हा प्रवास आजही सुरु आहे आणि नुकताच या प्रवासातला एक मैलाचा दगड त्याने पार केलाय. 162 कसोटी सामने खेळण्याचा. होय, 162 कसोटी खेळण्याचा. तुम्हाला हे वाचताना आश्चर्य वाटेल की एक वेगवान गोलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 162 कसोटी सामने खेळतो. आणि नुसता खेळतच नाही तर झोळी भरुन विकेट्सही आपल्या नावावर करतो.
गेल्या 19 वर्षांच्या कारकीर्दीत अँडरसनने इंग्लंडकडून खेळताना 162 कसोटींसह 194 वनडे आणि 19 ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात प्रतिनिधीत्व केले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या एजबॅस्टन कसोटीत जेव्हा अँडरसन मैदानात उतरला तेव्हा क्रिकेटच्या इतिहासात इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी खेळणाऱ्यांच्या यादीत तो अव्वल स्थानी पोहोचला. त्याचाच एकेकाळचा संघसहकारी आणि माजी कर्णधार अलिस्टर कूकचा विक्रम त्याने मोडीत काढला.
वेगवान गोलंदाजाने 19 वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणे ही साधी सोपी गोष्ट नव्हे. त्यात अँडरसनच्या पदार्पणावेळीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बदलाचे वारे वाहू लागले होते. 2005 साली ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटचा जन्म झाला. मर्यादित षटकांच्या सामन्यांवरच जास्त भर दिला जाऊ लागला. क्रिकेटमध्ये लीग हा प्रकार अस्तित्वात आला. पण अँडरसनने मात्र आपले लक्ष एकाच गोष्टीवर केंद्रित केले. ते म्हणजे कसोटी क्रिकेट. वेगवान गोलंदाज असूनही त्याने दुखापतींचा ससेमिरा आपल्या पाठी लागू दिला नाही. आणि म्हणूनच जगातला सर्वश्रेष्ठ वेगवान गोलंदाज म्हणून तो आज मिरवतोय.
अँडरसनच्या या संपूर्ण कारकीर्दीत इंग्लंड क्रिकेट बोर्डाचाही मोठा हातभार आहे. कारण इंग्लंडने गोलंदाजीचा भार कधीच एकट्यावर पडू दिला नाही. अँडरसनला दुसऱ्या बाजूने नेहमीच चांगली साथ लाभली. 2006 पासून ते आतापर्यंत स्टुअर्ट ब्रॉड हा अँडरसनचा यशस्वी साथीदार मानला जातोय. या दोघांनी मिळून आजवर 1100 च्या वर कसोटी विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत.
अँडरनची सुरुवात कमालीची झाली असली तरी पुढच्या काळात त्याची कामगिरी मंदावली. इंग्लंड संघात आपले स्थान पक्क करायला अँडरसनला पाच वर्षांहून अधिक काळ लागला. पण या काळात त्याने स्वत:मध्ये अनेक बदल केले. गोलंदाजीचे कसब आणखी वाढवण्यावर भर दिला. नॅचरल स्विंग बरोबरच रिव्हर्स स्विंग त्याने आपने प्रभावी अस्त्र बवलले. आणि म्हणूनच आज रेकॉर्डबुक ओपन केले तर त्यात अँडरसनच्या विक्रमांचे अनेक दाखले आपल्याला पाहायला मिळतात.
अँडरसनच्या खात्यात आज 162 कसोटीत 616 विकेट्स जमा आहेत. सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो चौथ्या स्थानावर आहे. भारताच्या अनिल कुंबळेचा 619 विकेट्सचा विक्रम तर अगदी त्याच्या दृष्टीपथात आहे. आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न आणि लंकेचा मुथय्या मुरलीधरन ही दोन मोठी नावे.
येत्या जुलैमध्ये अँडरसन 40व्या वर्षात पदार्पण करणार आहे. आपल्या निवृत्तीबाबत अँडरसनने अद्याप कोणताही जाहीर खुलासा केलेला नाही. त्यामुळे पुढची दोन वर्ष जर अँडरसन आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला तर कसोटी जगतात विक्रमांचे आणखी इमले बांधेल एवढे नक्की…
वेल डन जिमी अँडरसन…!
वाचनीय लेख-
चक्क १० व्या क्रमांकावर फलंदाजीला सुरुवात करूनही भविष्यात ‘तो’ न्यूझीलंडचा स्टार सलामीवीर बनला