साधारण ६ फुट ८ इंच अशी तगडी उंची. हवेत आणि ऑफ द पीच अशी दोन्हीकडे चेंडू स्विंग करण्याची कला. आणि जोडीला जवळपास १४० किलोमीटरप्रतितास इतका वेग. आपल्या भात्यातील याच शस्त्रांनी न्यूझीलंडच्या एका वेगवान गोलंदाजाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तिसर्या दिवशी अक्षरशः धुमाकूळ घातला. कागदावर बलाढ्य वाटणारी भारतीय फलंदाजी या गोलंदाजाने पाच बळी घेत उध्वस्त केली. अंतिम सामन्यात दमदार फलंदाजी करत असलेल्या विराट कोहलीला त्यानेच तंबूचा रस्ता दाखवला. हा गोलंदाज म्हणजे किवी आक्रमणाचा नवा चेहरा, कायले जेमिसन. आपल्या कारकिर्दीतील अवघ्या आठव्या सामन्यात क्रिकेट जगताचे लक्ष वेधून घेणारा हा जेमिसन नक्की आहे तरी कोण, याबद्दल या लेखातून जाणून घेऊया.
कायले जेमिसनचा जन्म ऑकलंडचा. आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात त्याने फलंदाजी अष्टपैलू म्हणून केली होती. मात्र प्रशिक्षकांच्या आग्रहामुळे नंतर तो वेगवान गोलंदाजी करु लागला. २०१४ साली त्याने न्यूझीलंडकडून १९ वर्षांखालील विश्वचषकात प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर २०२० साली त्याला न्यूझीलंडच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळाले. भारताविरुद्धच्या सामन्यात पदार्पण केल्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मागे वळून पाहिले नाही. वनडे क्रिकेटमध्ये त्याला फारसे उल्लेखनीय यश मिळाले नाही. मात्र कसोटी क्रिकेटमध्ये त्याने अभूतपूर्व कामगिरी केली.
आपल्या पदार्पणापासून त्याने न्यूझीलंडसाठी ८ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने तब्बल ४४ विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. इतकेच नाही तर यात त्याने पाच वेळा एका डावात पाच बळी घेण्याची कामगिरी केली आहे. एवढ्या कमी कसोटीत पाच वेळा पाच बळी मिळवणारा तो पहिला किवी गोलंदाज ठरला.
आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवणाऱ्या जेमिसनकडे आयपीएल संघांचे लक्ष गेले नसते तरच नवल. २०२१ सालच्या आयपीएल हंगामात विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या संघाने त्याला पंधरा कोटी रुपयात आपल्या संघात समाविष्ट केले. जेमिसनने संघाचा विश्वास सार्थ ठरवत या हंगामात खेळलेल्या ७ सामन्यात ९ विकेट्स घेण्याची कामगिरी केली. मात्र या आयपीएल दरम्यानचा एक वेगळाच किस्सा चर्चेत आला.
यंदाचा आयपीएल हंगाम सुरु झाला तेव्हा भारत आणि न्यूझीलंडचे संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात आमनेसामने असतील, हे स्पष्ट झाले होते. आणि हा सामना इंग्लंडमध्ये ड्यूक्स चेंडूने खेळवला जाणार होता. त्यामुळे या सामन्यापूर्वी सराव व्हावा या उद्देशाने कोहलीने जेमिसनला नेटमध्ये ड्यूक्स चेंडूने गोलंदाजी करण्याची विनंती केली होती. मात्र कोहलीचा धूर्त हेतू ओळखत जेमिसनने त्याला चक्क नकार दिला होता. हाच निर्णय सार्थ ठरल्याचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तिसर्या दिवशी दिसून आले. कारण जेमिसननेच एका भन्नाट इनस्विंगवर सेट झालेल्या कोहलीचा काटा काढला. खरंतर कोहली एकदा केलेली चूक परत करत नाही. तसेच ओळखीच्या गोलंदाजाला विकेट देणे, त्याला आवडत नाही. कोहली जर त्यावेळी जेमिसनला खेळला असता तर कदाचित वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मधले चित्र वेगळे असते.
यातील जर-तरचा भाग सोडला तरी जेमिसनच्या गोलंदाजी समोर भारतीय फलंदाजांकडे पहिल्या डावात तरी कुठलेही उत्तर नव्हते. याचाच परिणाम म्हणून जेमिसनने ३१ धावांत ५ विकेट्स घेत भारताचा डाव २१७ धावांवर संपुष्टात आणला. जेमिसनच्या या कामगिरीचा न्यूझीलंड संघाला सामन्यात किती फायदा होईल, हे लवकरच कळेल. मात्र त्याच्या रुपात टीम साउदी आणि ट्रेंट बोल्टचा वारसदार न्यूझीलंडला लाभला आहे, हे नक्की. इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेनने तर कायले जेमिसन आगामी काळात कसोटी क्रिकेटचा सुपरस्टार म्हणून उदयाला येईल, अशी भविष्यवाणी केली आहे. ही भविष्यवाणी जेमिसन खरी ठरवणार का, याकडे क्रिकेट रसिकांचे लक्ष असेल.