‘इंडिया का त्योहार’ म्हटल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा चौदावा हंगाम ९ एप्रिल रोजी सुरू झाला. चेन्नई येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात झालेल्या पहिल्या सामन्यात बेंगलोरने २ विकेट्सने विजयी पताका झळकावली. भलेही या सामन्यात मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला, मात्र त्यांच्या २० वर्षीय शिलेदाराने सर्वांनाच त्याच्या आयपीएल पदार्पण सामन्यातील कामगिरीची दखल घेण्यास भाग पाडले. हा क्रिकेटपटू म्हणजे, डावखुरा अष्टपैलू ‘मार्को जेन्सन’.
आयपीएल २०२१ लिलावात या अनपेक्षित नावावर मुंबई इंडियन्सने बोली लावली आणि सर्वांचे डोळे विस्फारले गेले होते. कारण, भारतात कोणालाही माहीत नसलेल्या या खेळाडूवर आयपीएलच्या सर्वात यशस्वी संघाने का बोली लावली असावी? हा प्रश्न सर्वांना सतावत होता.
याच जेन्सनला अधिक प्रतिक्षा न करता आयपीएल २०२१ चा पहिलाच सामना मुंबई इंडियन्सकडून खेळण्याची संधी मिळाली. या संधीला दोन्ही हातांनी घट्ट पकडत जेन्सनने त्याचे पदार्पणही गाजवले. ४ षटकात अवघ्या २८ धावा देत त्याने २ विकेट्स चटकावल्या. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल हा त्याची पहिली आणि महत्त्वाची विकेट ठरला. अनोखी फटकेबाजी करत बेंगलोरला विजयी लक्ष्यानजीक घेऊन जात असताना जेन्सनने मॅक्सवेलच्या खेळीवर पूर्णविराम लावला होता.
परंतु, मुंबईने २० लाखांची किंमत मोजत खरेदी केलेला आणि हंगामातील पहिल्याच सामन्यात संधी दिलेला हा ‘मार्को जेन्सन’ नक्की आहे तरी कोण? हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. चला तर सुरुवात करुया…
दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज आहे मार्को
मार्को जेन्सन हा दक्षिण आफ्रिकेचा युवा वेगवान गोलंदाज आहे. दक्षिण आफ्रिकेतील क्लर्क्सडोर्प येथील त्याचा जन्म. सध्या २० वर्षाच्या असलेल्या मार्कोबद्दल एक विशेष गोष्ट अशी आहे की, तो आणि त्याचा जुळा भाऊ डूआन हे दोघेही क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज आहे. नॉर्थ वेस्ट प्रोवियन्ससाठी दोघे भाऊ क्रिकेट खेळतात.
ही आहेत मार्कोची वैशिष्ट्ये
मुंबई इंडियन्सने त्याच्यासाठी बोली लावण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे तो निरंतर १४० किमी प्रति तासपेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करू शकतो. तसेच, आठव्या-नवव्या क्रमांकावर फलंदाजीला येत मोठ-मोठे फटके मारण्याची त्याची क्षमता वाखाणण्याजोगी आहे. या सर्वात त्याच्या बाजूने जाणारी गोष्ट म्हणजे तो तब्बल ६ फूट ८ इतक्या उंचीचा आहे. मुंबई इंडियन्स संघ व्यवस्थापन भविष्याचा विचार करत असेल तर, त्यांचा मार्कोला संघात स्थान देण्याचा निर्णय योग्य असेल.
आम्ही त्यावर दोन वर्षापासून लक्ष ठेवून होतो
मार्को जेन्सनच्या निवडीनंतर मुंबई इंडियन्सचा क्रिकेट हेड जहीर खान व संघमालक आकाश अंबानी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले
“जेन्सनवर कोणीतरी बोली लावेल अशी आम्हाला अपेक्षा होती. मात्र, तसे झाले नाही. सध्या तो दक्षिण आफ्रिकेतील सर्वात प्रतिभावान गोलंदाज म्हणून ओळखला जातो. आम्ही मागील दोन वर्षापासून त्याच्यावर लक्ष ठेवून आहोत. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार व आमचा सलामीवीर डी कॉक याच्याशी आम्ही मार्कोविषयी चर्चा केली आणि त्याने तो आयपीएल खेळण्यासाठी तयार असल्याचे म्हटले.”
भारतात येऊन गेला आहे मार्को
मार्को जेन्सनने २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला नेटमध्ये गोलंदाजी देखील केली होती. मार्को २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा १९ वर्षाखालील संघासोबत भारत दौऱ्यावर देखील येऊन गेला आहे. नुकत्याच संपलेल्या पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी जेन्सनचा समावेश दक्षिण आफ्रिकेच्या संघात करण्यात आला होता. परंतु, त्याला आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी अजून मिळाली नाही.
मार्कोची आतापर्यंतची आकडेवारी
मार्कोच्या आत्तापर्यंतच्या क्रिकेट कारकीर्दीविषयी बोलायचे झाल्यास तो फक्त १४ प्रथम श्रेणी सामने खेळला आहे. ज्यामध्ये ४४० धावा व ५४ बळी त्याने आपल्या नावे केले आहेत. मार्को टी२० चे ११ सामने खेळला आहे, ज्यामध्ये त्याला फक्त ८ बळी घेण्यात यश लाभले. तर, १३ लिस्ट ए सामन्यात त्याने १६ बळी आपल्या नावे केले आहेत.
मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये आतापर्यंत शॉन पोलॉक, लसिथ मलिंगा, मिचेल मॅकलनघन, मिचेल जॉन्सन यांसारख्या विदेशी वेगवान गोलंदाजांच्या बळावर सर्व संघांना पाणी पाजले आहे. आत्ताही त्या संघात ट्रेंट बोल्ट, नॅथन कुल्टर-नाईल व ऍडम मिलनेया आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभवी गोलंदाजांचा समावेश आहे. पदार्पणाच्या आयपीएल सामन्यात संघातील दिग्गज गोलंदाजांना लाजवेल अशी कामगिरी करणारा हा दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज आगामी सामन्यातही त्याच्या कामगिरीचा ठसा उमटवेल, यात शंका नाही.
महत्त्वाच्या बातम्या-