पाकिस्तानी संघासाठी ८ ऑक्टोबर १९९७ या दिवशी एका २२ वर्षीय अष्टपैलूने पदार्पण केले. आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात या खेळाडूने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले. विशेष म्हणजे दोन्ही डावात तो बाद झाला नाही. झोकात पदार्पण झालेल्या या खेळाडूने त्यानंतर मागे वळून पाहिलेच नाही. पुढील आठ कसोटी सामन्यात त्याने तीन शतके झळकावली.
मात्र अवघ्या २६व्या वर्षी हा खेळाडू कसोटी संघातून बाहेर झाला आणि त्यानंतर पुन्हा कधीच कसोटी क्रिकेट खेळू शकला नाही. वनडे सामन्यात त्याने कट्टर प्रतिस्पर्धी भारताविरुद्ध पदार्पण केले. या सामन्यात फार खास कामगिरी केली नसली तरी दमदार फलंदाजी आणि उपयुक्त गोलंदाजीने त्याने आपली संघातील जागा टिकवून ठेवली. एक दिवस बोर्डाच्या अध्यक्षांनी संघाचे कर्णधारपद सांभाळण्याची ऑफर दिली. मात्र ती धुडकावून लावल्याने नंतर संघातील स्थानही गमवावे लागले. अखेर हा खेळाडू पाकिस्तान सोडून इंग्लंडमध्ये स्थायिक झाला.
ही रोमांचक कहाणी आहे अझर मेहमूद या खेळाडूची. आज (२८ फेब्रुवारी) या हरहुन्नरी खेळाडूचा वाढदिवस आहे. अझर मेहमूदने आपल्या कारकिर्दीत अनेक चढ-उतारांचा सामना केला. आजच्या त्याच्या वाढदिवसानिमित्त या लेखात आपण त्याच्या कारकिर्दीबद्दल जाणून घेऊया.
पाकिस्तान संघाकडूनची कारकीर्द
वयाच्या २२व्या वर्षी पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघाकडून पदार्पण केलेल्या अझर मेहमूदची पाकिस्तान संघाकडून फारशी बहरली नाही. खरंतर पदार्पणापासूनच आपल्या दमदार खेळाने त्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने कर्णधारपद सांभाळण्याबाबत विचारले असता त्याने नकार दिला. पण यामुळे बोर्डाची त्याच्यावर खप्पा मर्जी झाली आणि त्याला पाकिस्तानच्या संघात स्थान मिळणे, बंद झाले. मात्र नंतर मेहमूदने या निर्णयाबद्दल आपल्याला खेद वाटत असल्याचे सांगितले होते. जर कर्णधारपद स्वीकारले असते, तर अधिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली असती, असे तो नंतर म्हणाला.
इंग्लंडला झाला स्थायिक
सन २००२ मध्ये अझर इंग्लंडला स्थायिक झाला. तिथे त्याने सर्रेच्या संघाकडून कौंटी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्याने लँकेशायरच्या संघाविरुद्ध खेळतांना ६१ धावा देत ८ बळी घेण्याची कामगिरी केली होती. त्यानंतर पुढील दोन हंगामात तो लँकेशायरच्या संघाकडूनच खेळला. या दरम्यान त्याने पाकिस्तानकडून पुनरागमन करण्याची आशा सोडून दिली होती. त्याने बिर्तीश वंशाच्या एका मुलीसोबत लग्न करत इंग्लंडचे नागरिकत्व स्वीकारले.
आयपीएलमध्ये खेळणारा एकमेव पाकिस्तानी खेळाडू
अझर मेहमूद हा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये खेळणार एकमेव पाकिस्तानी खेळाडू ठरला. २०१२ आणि २०१३ सालच्या हंगामात तो किंग्ज इलेव्हन पंजाब या संघाकडून आयपीएल मध्ये सहभागी झाला होता. या दोन हंगामात त्याने ३८२ धावा आणि २९ बळी घेण्याची कामगिरी केली. त्यांनतर २०१५ साली जिमी निशम दुखापतग्रस्त झाल्याने त्याला कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाकडून खेळण्याचीही संधी मिळाली. मात्र तिथे तो फार विशेष प्रदर्शन करू शकला नाही. मात्र आयपीएलमध्ये खेळणारा तो शेवटचा पाकिस्तानी खेळाडू ठरला.
त्यानंतर वयाच्या ४०व्या वर्षापर्यंत तो जगभरातील विविध टी-२० लीगमध्ये भाग घेत होता. आता तो प्रशिक्षक म्हणून विविध संघांसाठी कार्यरत आहे.
महत्वाच्या बातम्या: