समारा | २०१८ च्या फिफा विश्वचषकात शनिवारी (७ जुलै) झालेल्या इंग्लंड वि. स्वीडन यांच्यातील उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात इंग्लंडने स्वीडनचा २-० असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली.
समारा फुटबॉल अरेना येथे झालेल्या या सामन्यात इंग्लंडने स्वीडनचा पराभव करत तब्बल २८ वर्षानंतर विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
या सामन्यात इंग्लंडकडून ३० व्या मिनिटाला हॅरी मैग्यूरो आणि डेल अलीने ५८ व्या मिनिटाला हेडरद्वारे अप्रतिम गोल करत इंग्लंडच्या विजयात मोलाची भूमिका निभावली.
पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघानी बचावात्मक खेळ केला. मात्र ३० व्या मिनिटाला मिडफील्डर यंगने दिलेल्या फ्री किकच्या पासवर हॅरी मैग्यूरो हेडद्वारे गोल करत इंग्लंडला १-० अशी आघाडी मिळवून दिली.
पहिला हाफ समाप्त होण्याला २ मिनिटे बाकी असताना इंग्लंडकडे आणखी एक गोल करण्याची संधी होती. मात्र इंग्लंडच्या स्टर्लिंगचे प्रयत्न स्वीडनचा गोलकीपर ओल्सन आणि आणि डिफेंडर लिंटेलोफने हाणून पाडले.
दुसऱ्या हाफच्या सुरवातीला स्वीडनने आक्रमक खेळ करत ४७ व्या मिनिटाला करण्याची संधी मिळवली होती.
मात्र स्वीडनचा स्ट्राइकर बर्गने मारलेला हेड इंग्लंडचा गोलकीपर पीकफोर्डने अप्रतिमरीत्या आडवत स्वीडनच्या बरोबरी करण्याच्या आशेवर पाणि फिरवले.
त्यानंतर दुसऱ्या हाफमधे इंग्लंडने पुन्हा एकदा सामन्याची सर्व सुत्रे आपल्या हाती घेतली. ५८ व्या मिनिटाला इंग्लंडच्या डेल अलीने हेडरने गोल करत २-० अशी आघाडी घेतली.
इंग्लंडच्या या विजयात गोलकीपर पिकफोर्डने महत्वाची भूमिका निभावली. त्याने या सामन्यात उत्कृष्ठ गोलरक्षण करत स्वीडनला गोल करण्याची एकही संधी दिली नाही.
या कामगिरीसाठी जॉर्डन पिकफोर्डला मॅन ऑद द मॅचचा पुरस्कार देण्यात आला.
या सामन्यातील विजयी इंग्लड आता क्रोएशिया विरुद्ध उपांत्य फेरीच्या सामन्यात बुधवारी (११ जुलै) दोन हात करेल.
महत्त्वाच्या बातम्या-








