नुकताच २०२१ वर्ष संपन्न झाले असून २०२२ वर्षाला प्रारंभ झाला आहे. २०२०-२१ या वर्षात जगभरात कोरोनाने थैमान घातला होता. ज्यामुळे अनेक मोठ मोठ्या स्पर्धा स्थगित करण्यात आल्या होत्या. आता येणाऱ्या २०२२ वर्षात क्रिडा प्रेमींसाठी मेजवानी असणार आहे. चला तर पाहूया आगामी वर्षात कुठल्या कुठल्या स्पर्धा पाहायला मिळणार आहेत.
क्रिकेट :
भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका (India tour of South Africa) दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी आणि ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. कसोटी मालिका झाल्यानंतर वनडे मालिका पार पडणार ज्याचे कर्णधारपद केएल राहुलच्या हाती सोपवण्यात आले आहे. रोहित शर्मा दुखापतीमुळे संघाबाहेर झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच वेस्ट इंडिजमध्ये आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेचे (Icc under 19 world cup) (१५ जानेवारी ते ५ फेब्रुवारी) आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेत भारतीय १९ वर्षाखालील संघाची जबाबदारी यश धुलला देण्यात आली आहे. भारतीय संघाने ४ वेळेस या जेतेपदावर आपले नाव कोरले आहे. आता ५ व्या वेळेस हा संघ जेतेपद मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या स्पर्धेत १६ संघांमध्ये ४८ सामने पार पडणार आहेत.
न्यूझीलंडमध्ये आयसीसी महिला वनडे विश्वचषक स्पर्धेचे (icc women’s World Cup ) आयोजन ४ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान करण्यात येणार आहे. कोरोनाचा फटका या स्पर्धेला देखील बसला होता. ज्यामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. भारतीय कर्णधार मिताली राज ही स्पर्धा जिंकून आपल्या कारकीर्दीचा शेवट करू शकते.
तसेच ऑस्ट्रेलियामध्ये पुरुष टी२० विश्वचषक २०२२ (T20 world cup) स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात येणार आहे. २०२१ मध्ये झालेल्या टी२० विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघाने बाजी मारली होती. आता आपल्याच मायदेशात त्यांच्यावर या जेतेपदाचा बचाव करण्याची जबाबदारी असणार आहे.
आशियाई खेळ (१० सप्टेंबर ते २५ सप्टेंबर):
ही स्पर्धा चीनच्या हँगझोऊमध्ये पार पडणार आहे. अशियाई स्पर्धांमध्ये भारतीय संघाची कामगिरी उल्लेखनीय आहे. तसेच २०२१ मध्ये झालेल्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत देखील भारतीय खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली होती.
फुटबॉल :
भारतात एएफसी आशियाई महिला चषक स्पर्धेचे आयोजन २० जानेवारी ते ७ फेब्रुवारी दरम्यान करण्यात येणार आहे. भारतीय महिला फुटबॉलसाठी हे एक मोठे पाऊल असेल कारण देशाला १९७९ नंतर प्रथमच या सर्वोच्च प्रादेशिक स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची संधी मिळणार आहे. १९७९ आणि १९८३ मध्ये भारत या स्पर्धेत उपविजेता ठरला असून या कामगिरीपासून प्रेरणा घेण्याचा प्रयत्न करणार आहे.
तसेच १७ वर्षाखालील फिफा महिला विश्वचषक स्पर्धेचे आयोजन भारतात ११ ते ३० ऑक्टोबर दरम्यान करण्यात येणार आहे. देशातील महिला खेळाडूंसाठी ही आणखी एक महत्त्वाची स्पर्धा असणार आहे. ही स्पर्धा २०२१ मध्ये पार पडणार होती. परंतु कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली आहे.
हॉकी :
स्पेन आणि नेदरलँड्समध्ये एफआयएच महिला विश्वचषक स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. भारतीय महिला हॉकी संघाने टोकियो ऑलिंपिकमध्ये चौथे स्थान मिळवले होते. या चमकदार कामगिरीसह राणी रामपाल आणि तिचे सहकारी हीच सकारात्मक कामगिरी पुढे घेऊन जाण्याच्या विचारात असतील. विश्वचषक स्पर्धेत संघाची सर्वोत्तम कामगिरी १९७४ मध्ये होती जेव्हा संघ चौथ्या स्थानावर होता. इंग्लंडमध्ये झालेल्या शेवटच्या स्पर्धेत हा संघ आठव्या स्थानावर राहिला होता.
महत्वाच्या बातम्या :
जोहान्सबर्ग कसोटीसाठी भारतीय संघात होणार दोन बदल? अश्विन-शार्दुलचा पत्ता कट?
‘द्रविड त्या खेळाडूला पॅकेज म्हणून पाहतोय’
हे नक्की पाहा :