भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज आणि २०१३ आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात कारवाई झालेला श्रीसंत लवकरच पुन्हा एकदा स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची शक्यता आहे. केरळ क्रिकेट संघटनेने आगामी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी जाहीर केलेल्या संभाव्य संघात श्रीसंतचा समावेश केला आहे. बीसीसीआयची प्रमुख टी२० स्पर्धा असलेली सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धा १० जानेवारीपासून सुरू होईल.
स्पॉट फिक्सिंग प्रकरणात झाले होते श्रीसंतचे निलंबन
आयपीएल २०१३ मध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणात श्रीसंतचा सहभाग असल्याचा आरोप ठेवून त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्याचे हे निलंबन यावर्षी सप्टेंबर महिन्यात पूर्ण झाले. त्यामुळे, तो देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास पात्र ठरत आहे. त्याच अनुषंगाने आज (१५ डिसेंबर) केरळ क्रिकेट संघटनेने त्याचा समावेश सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठीच्या केरळच्या संभाव्य संघात केला.
श्रीसंतसोबत असतील हे अनुभवी खेळाडू केरळ संघाचा भाग
केरळ क्रिकेट संघटनेने जाहीर केलेल्या या २६ जणांच्या संघात ३७ वर्षीय श्रीसंतसोबत रॉबिन उथप्पा, सचिन बेबी, जलज सक्सेना आणि संजू सॅमसन या अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. श्रीसंत आपल्या संघासोबत २०-३० डिसेंबरदरम्यान सराव शिबिरात ही सहभागी होईल. श्रीसंत मागील काही दिवसांपासून नियमितपणे सराव करत आहे. त्याचे सरावाचे व्हिडिओ मागील काही दिवसात व्हायरल झाले होते. श्रीसंत भारताने जिंकलेल्या २००७ टी२० विश्वचषक व २०११ वनडे विश्वचषक संघाचा सदस्य होता.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीने देशांतर्गत हंगामाला सुरुवात
कोविड-१९ महामारीमुळे बंद असलेले भारतीय क्रिकेट सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीद्वारे सुरु होईल. स्पर्धा १० जानेवारीपासून सुरू होऊन ३१ जानेवारीपर्यंत चालेल. संपूर्ण स्पर्धा जैव-प्रतिबंधक वातावरणात खेळवली जाईल. आगामी आयपीएलचा मेगालिलाव होणार असल्याने या स्पर्धेचे महत्त्व वाढले आहे.
महत्वाच्या बातम्या:
– अब आयेगा मजा! रोहित झाला ऑस्ट्रेलियाला रवाना; खेळणार इतके कसोटी सामने
– पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा, या अष्टपैलूला तब्बल ४ वर्षांनंतर स्थान
– युवा खेळाडूंना आयपीएल लिलावापूर्वी मिळणार व्यासपीठ, मुश्ताक अली टी२० स्पर्धेच्या तारखा जाहीर