भारताचा वेगवान गोलंदाज एस श्रीसंत सध्या कोणत्या-ना-कोणत्या कारणाने सतत चर्चेत राहत आहे. श्रीसंतने आयपीएल २०२१ च्या लिलावासाठी नाव नोंदणी केली होती. मात्र, फ्रँचायझींनी ठरवलेल्या अंतिम यादीमध्ये त्याचा समावेश केला गेला नव्हता. आयपीएलसाठी डावलल्यानंतर श्रीसंतने विजय हजारे ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी करत आपले नाणे अजूनही खणखणतीत असल्याचे सिद्ध केले आहे.
आयपीएल लिलावासाठी अंतिम यादीत नव्हते नाव
आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी निलंबनाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर श्रीसंतने जानेवारी महिन्यात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतून स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते. त्यानंतर आयपीएलसाठी त्याने नावनोंदणी केलेली. मात्र, फ्रँचायझींनी अंतिम केलेल्या २९२ खेळाडूंच्या यादीमध्ये त्याचे नाव सामाविष्ट नव्हते. या कारणाने श्रीसंत अत्यंत नाराज झाला होता.
विजय हजारे ट्रॉफीमध्ये बळींचे पंचक
सोमवारी (२२ फेब्रुवारी) विजय हजारे ट्रॉफीतील एलिट-क गटातील केरळ विरुद्ध उत्तर प्रदेश हा सामना अलूर येथे खेळला गेला. या सामन्यात ‘केरळ एक्सप्रेस’ श्रीसंतने आपल्या दहा षटकात ६५ धावा देऊन उत्तर प्रदेशच्या पाच फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. श्रीसंतने अभिषेक गोस्वामी, भुवनेश्वर कुमार, आकाशदीप नाथ, मोहसिन खान व शिवम शर्मा यांना बाद केले.
अनुभवी रॉबिन उथप्पा व कर्णधार सचिन बेबी यांच्या अर्धशतकांच्या जोरावर केरळने २८४ धावांचे आव्हान तीन गडी राखून पार केले व स्पर्धेतील सलग दुसरा विजय मिळवला. लिस्ट-ए सामन्यात श्रीसंतने यापूर्वी २००६ मध्ये ५ बळी मिळवले होते. यासह तब्बल १५ वर्षांनंतर त्याने कोणत्या क्रिकेट सामन्यात बळींचा पंचक केला आहे.
स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आढळला होता दोषी
भारताच्या २०११ क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य असलेला श्रीसंत २०१३ मध्ये आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळला होता. त्यानंतर त्याच्यावर सात वर्ष निलंबनाची कारवाई केली गेली होती. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात हा कालावधी संपुष्टात आल्याने त्याचा स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्याचा मार्ग मोकळा झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
तब्बल १४.२५ कोटींचा धनी ठरलेल्या ‘मॅक्स’भाऊचा फ्लॉप शो, नेटकऱ्यांनी विराटच्या आरसीबीला केलं ट्रोल
‘या’ धाकड फलंदाजांना रिलीज करुन तोंडघशी पडली आरसीबी, एकाने तर केलीत ४ शतके





