भारताचा डावखुरा यॉर्कर गोलंदाज टी नटराजन याला गेल्यावर्षी आयपीएल दरम्यान भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने दिलेल्या सल्ल्यामुळे चमकदार कामगिरी करता आली. धोनीने त्याला स्लो बाऊन्सर आणि कटर गोलंदाजी करण्याचा सल्ला दिला. ज्यामुळे त्याच्या गोलंदाजी कौशल्यात वाढ झाली. तीस वर्षीय नटराजनने आयपीएल 2020 मध्ये सर्वाधिक 71 यॉर्कर्स चेंडू टाकले होते आणि यामध्ये त्याने धोनी आणि एबी डिव्हिलियर्स सारख्या महान खेळाडूंना बाद केले होते.
‘ईएसपीएन क्रिकइन्फो’शी बोलताना त्याने सांगितले की, “धोनीसारख्या खेळाडूशी बोलायची संधी मिळणे हीच माझ्यासाठी एक मोठी गोष्ट आहे. त्याने मला तंदुरुस्तीबद्दल सांगितले आणि प्रोत्साहनही दिले. तसेच जसा जसा अनुभव येईल तशी आणखी चांगली खेळी करशील असे त्याने सांगितले. स्लो बाउन्सर, कटर यांसारख्या गोष्टींचा गोलंदाजीत वापर केल्यास ते माझ्यासाठी उपयुक्त ठरणार आहे असे सांगितले.”
सनरायझर्स हैदराबादच्या या वेगवान गोलंदाजाने धोनीला बाद केले होते. आयपीएलमध्ये केलेल्या चमकदार कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाच्या दौर्यासाठी राखीव खेळाडू म्हणून भारतीय संघात त्याचा समावेश करण्यात आला आणि नंतर प्लेइंग इलेव्हनमध्येही त्याला स्थान मिळाले होते. या ऑस्ट्रेलिया दौर्यादरम्यान त्याने कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या तिन्ही स्वरूपाच्या क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
याबद्दल बोलताना नटराजन म्हणाला की, “मी त्याला पहिल्यांदा बॅटजवळ चेंडू टाकला. तेव्हा त्याने जवळजवळ 102 मीटरचा मोठा षटकार ठोकला. पण पुढच्याच चेंडूने मी त्याची बळी घेतला. परंतु आनंद साजरा केला नाही. मी फक्त मागील चेंडूबद्दल विचार करत होतो. ड्रेसिंग रूममध्ये परतल्यानंतर मी आनंदी होतो.”
तसेच त्याने या चित्तथरारक आयपीएल सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा महान खेळाडू एबी डिव्हिलियर्सलाही बाद केले होते. ज्यादिवशी त्याने ही विकेट घेतली त्या दिवशी त्याला मुलगी झाली होती. तो म्हणाला की, “एकीकडे माझ्या घरी मुलगी जन्माला आली आणि दुसरीकडे या सामन्यात मला महत्त्वपूर्ण विकेट मिळाली होती. त्यामुळे मी खूप आनंदी होतो. परंतु मी मला मुलगी झाली याबद्दल कोणालाही सांगितले नव्हते. ”
यामागचे कारण सांगताना तो म्हणाला की, “मला वाटले की सामना जिंकल्यानंतर मी सर्वांना याबद्दल सांगेन. पण माझा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने याबद्दल सर्वांना सांगितले.”
यंदा सनरायझर्स हैदराबाद संघ त्यांच्या मोहिमेला रविवारी (11 एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध सुरूवात करणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
फलंदाजीत सुपरफ्लॉप ठरलेले एक असे क्रिकेटपटू, ज्यांच्या बायकोलाही नव्हता त्यांच्या खेळीवर विश्वास
“एक दिवस तस्लीमा नसरीन मला प्रत्यक्षात भेटली तर…,” मोईन अलीच्या वडिलांची जबरदस्त फटकार
वयाची तिशी पार केलेल्या ‘या’ अष्टपैलूला करायचंय टीम इंडियात पुनरागमन, आकडेवारी राहिलीय कौतुकास्पद