शारजाह। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील ४४ वा सामना सनरायझर्स हैदाराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात झाला. शारजाह क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने ६ विकेट्सने विजय मिळवला. हा चेन्नईचा ११ सामन्यांतील ९ वा विजय ठरला. त्यामुळे चेन्नई १८ गुणांसह प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. आयपीएल २०२१ हंगामात प्ले ऑफसाठी पात्र ठरणारा चेन्नई पहिला संघ ठरला.
या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने २० षटकांत ७ बाद १३४ धावा केल्या होत्या. तसेच चेन्नई सुपर किंग्स संघाला विजयासाठी १३५ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान चेन्नई सुपर किंग्सने १९.४ षटकांत ४ विकेट्सच्या मोबदल्यात १३९ धावा करत पूर्ण केले.
चेन्नईकडून १३५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऋतुराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसिसने चांगली सुरुवात केली होती. या दोघांनी खराब चेंडूंचा समाचार घेत चेन्नईला अर्धशतकी सलामी दिली. पण, दोघेही अर्धशतकाच्या जवळ येऊन बाद झाले. ऋतुराजला जेसन होल्डरने ११ व्या षटकात ४५ धावांवर बाद केले. ऋतुराजने ३८ चेंडूत ही खेळी करताना ४ चौकार आणि २ षटकार मारले. त्याने फाफ डू प्लेसिससह ७५ धावांची भागीदारी केली.
ऋतुराज बाद झाल्यानंतर डू प्लेसिसने मोईन अलीसह डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोईन १५ व्या षटकात राशिद खानविरुद्ध फटका खेळण्याच्या नादात १७ धावांवर त्रिफळाचीत झाला. सुरेश रैनाही फार काळ टीकू शकला नाही. त्याला १६ व्या षटकात जेसन होल्डरने २ धावांवर पायचीत केले. याच षटकात होल्डरने डू प्लेसिसलाही सिद्धार्थ कौलकरवी झेलबाद करत सामन्यात रोमांच आणला. डू प्लेसिसने ३६ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारासह ४१ धावा केल्या.
अखेर अंबाती रायडू आणि एमएस धोनीने आणखी पडझड होऊ दिली नाही. चेन्नईला ११ चेंडूत १५ धावांची गरज असताना रायडूने खणखणीत षटकार ठोकत चेंडू आणि धावांमधील अंतर कमी केले. अखेरच्या षटकात चेन्नईला ३ धावांची गरज होती. पण पहिल्या ३ चेंडूंवर सिद्धार्थ कौलने केवळ १ धावच दिली. पण धोनीने चौथ्या चेंडूवर शानदार षटकार ठोकत सामना चेन्नईच्या पारड्यात टाकला. रायडू १३ चेंडूत १७ धावांवर आणि धोनी ११ चेंडूत १४ धावांवर नाबाद राहिला.
हैदराबादकडून या सामन्यात जेसन होल्डरने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर, राशिद खानने १ विकेट घेतली.
साहाची एकाकी झुंज
या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या हैदराबाद संघाकडून वृद्धिमान साहा आणि जेसन रॉय यांची जोडीने डावाची सुरुवात केली. साहाने चांगली सुरुवात करताना काही आक्रमक फटके खेळले. मात्र, जेसन रॉयला खास काही करता आले नाही. तो २ धावांवर चौथ्या षटकात जोश हेजलवूडच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक एमएस धोनीकडे झेल देऊन बाद झाला.
यानंतर साहाला कर्णधार केन विलियम्सनने साथ देण्याचा प्रयत्न केला. विलियम्सनही फार काळ टीकू शकला नाही. त्याला ड्वेन ब्रावोने ७ व्या षटकात ११ धावांवर पायचीत केले. त्यानंतर ११ व्या षटकात सावध खेळ करणारा प्रियम गर्गदेखील ११ व्या षटकांत ब्रावोविरुद्ध खेळताना एमएस धोनीकडे झेल देत ७ धावांवर माघारी परतला.
एकीकडे विकेट जात असताना साहाने दुसरी बाजू सांभाळली होती. पण, त्याचा अडथळा रविंद्र जडेजाने १३ व्या षटकात दूर केला. साहाचा झेल देखील धोनीने पकडला. साहाने ४६ चेंडूत ४४ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने १ चौकार आणि २ षटकार ठोकले. साहा बाद झाल्यानंतरही हैदराबादकडून कोणाला फारसा प्रभाव पाडता आला नाही.
साहा बाद झाल्यानंतर अभिषेक शर्मा आणि अब्दुल सामद या युवा क्रिकेटपटूंनी डाव सावरण्याचा प्रत्यत्न केला होता. पण अभिषेकला १७ व्या षटकात जोस हेजलवूडने फाफ डू प्लेसिसकरवी झेलबाद केले, तर त्याच षटकात अब्दुल सामद मोईन अलीकडे झेल देऊन बाद झाला. अभिषेक आणि अब्दुल या दोघांनीही प्रत्येकी १८ धावा केल्या. अष्टपैलू जेसन होल्डरला १९ व्या षटकात शार्दुल ठाकूरने ५ धावांवर बाद केले.
अखेर भुवनेश्वर कुमार आणि राशिद खानने हैदराबादला २० षटकांत ७ बाद १३४ धावांपर्यंत पोहचवले. भुवनेश्वर २ धावांवर आणि राशिद १७ धावांवर नाबाद राहिले. चेन्नईकडून हेजलवूडने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर, ड्वेन ब्रावोने २ विकेट्स घेतल्या. तसेच शार्दुल ठाकूर आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी १ विकेट घेतली.
असे आहेत दोन्ही संघ
या सामन्यासाठी चेन्नईने सॅम करन ऐवजी ड्वेन ब्रावोला अंतिम ११ जणांच्या संघात स्थान दिले आहे. तसेच हैदराबादने मात्र अंतिम ११ जणांच्या संघात कोणताही बदल केलेला नाही. म्हणजेच या सामन्यातही डेव्हिड वॉर्नर अंतिम ११ जणांमधून बाहेर असेल.
🚨 Toss Update from Sharjah 🚨@ChennaiIPL have elected to bowl against @SunRisers. #VIVOIPL #SRHvCSK
Follow the match 👉 https://t.co/QPrhO4XNVr pic.twitter.com/2DjvLhU1dx
— IndianPremierLeague (@IPL) September 30, 2021
असे आहेत ११ जणांचे संघ –
सनरायझर्स हैदराबाद: जेसन रॉय, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), केन विलियम्सन (कर्णधार), प्रियम गर्ग, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, जेसन होल्डर, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, संदीप शर्मा.
चेन्नई सुपर किंग्स: ऋतुराज गायकवाड, फाफ डू प्लेसिस, मोईन अली, अंबाती रायडू, सुरेश रैना, एमएस धोनी (यष्टीरक्षक/कर्णधार), रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर, जोश हेजलवुड.