बुधवारी झालेल्या आयपीएल 2025 च्या 41व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा 7 विकेट्सने पराभव केला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईचा हा सलग चौथा विजय आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच डगमगलेली मुंबई आता विजयाच्या मार्गावर परतली आहे. पॉइंट टेबलमध्येही चांगल्या स्थानावर आली आहे. 10 गुणांसह संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. या सामन्यापूर्वीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हार्दिक प्रशिक्षक महेला जयवर्धनेशी वाद घालताना दिसत आहे.
हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यापूर्वी, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांनी मौन पाळले. सर्व खेळाडू काळ्या पट्ट्या घालून मैदानावर आले. हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये हार्दिक पांड्या त्याच्याच संघाचा प्रशिक्षक महेला जयवर्धनेशी वाद घालताना दिसत आहे. तो प्रशिक्षकाला काय बोलत आहे हे स्पष्ट नसले तरी व्हिडिओ पाहून असे वाटते की हार्दिक त्याच्यावर एखाद्या गोष्टीवरून रागावला आहे.
— crictalk (@crictalk7) April 23, 20254
सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, हार्दिकने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली. मुंबईकडून ट्रेंट बोल्टने 4 विकेट्स घेत महत्त्वाची भूमिका बजावली हेनरिक क्लासेनच्या 71 धावांच्या जोरावर SRH ने 143 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना रायन रिकेल्टन लवकर बाद झाल्यानंतर रोहित शर्मा (70 धावा) आणि सूर्यकुमार यादव (नाबाद 40) यांच्या खेळीने मुंबईने 26 चेंडू राखून 7 विकेट्सनी विजय मिळवला.