पल्लेकेल: येथे सुरू असलेल्या श्रीलंका आणि भारत विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने वर्चस्व मिळवले आहे. ४८६ धावांचा डोंगर उभारल्या नंतर भारताने श्रीलंकेला १३५ धावत गुंडाळले आहे. भारताकडे ३५२ धावांची मोठी आघाडी आहे. मोहम्मद शमी आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी २ बळीतर कुपलीप यादवने चमकदार कामगिरी करत ४ मोहरे टिपले. शतकवीर हार्दिक पांड्यानेही १ विकेट घेतली.
पहिल्या डावात भारताच्या ४८७ धावांच्या डोंगराचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाला म्हणावी तशी सुरुवात मिळाली नाही. त्यांच्या दोन्ही सलामीवीरांना शमीने तंबूत पाठवले तर हार्दिक पांड्यने ही गोलंदाजी करताना अँजेलो मॅथ्यूजला बाद केले. त्यानंतर भारताने कुशल मेंडिसला धावचीत केले. कुलदीप यादव आणि अश्विन गोलंदाजीसाठी आल्यानंतर त्यांनी श्रीलंकेच्या एकही फलंदाजाला टिकू दिले नाही.
श्रीलंका या मालिकेत दुसऱ्यांदा फॉलो ऑन टाळू शकली नाही. भारताने आता श्रीलंकेला पुन्हा फलंदाजीस आमंत्रित केले आहे. भारताचा पूर्ण प्रयत्न असेल की आज उरलेल्या वेळात श्रीलंकेवर दबाव टाकून आणखीन एक तरी श्रीलंकेची विकेट तंबूत पाठवण्याचा.