महिला आशिया चषक 2024 च्या फायनलमध्ये श्रीलंकेनं भारताचा 8 गडी राखून पराभव केला आहे. यासह भारत आठव्यांदा आशिया चषक चॅम्पियन बनण्यापासून वंचित राहिला. महिला आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभूत होण्याची भारताची ही दुसरी वेळ आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतानं 20 षटकांत 6 गडी गमावून 165 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, श्रीलंकेच्या संघानं 8 चेंडू बाकी असताना 8 गडी राखून विजय मिळवला. श्रीलंकेचं हे आशिया चषक स्पर्धेचं पहिलंच विजेतेपद आहे. श्रीलंकेसाठी कर्णधार चमारी अटापट्टू आणि हर्षिता समरविक्रमा यांनी अर्धशतकी खेळी खेळल्या. तर भारताकडून दीप्ती शर्मानं एक विकेट घेतली.
भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून सर्वाधिक धावा सलामीवीर स्मृती मानधनानं केल्या, जिनं 47 चेंडूत 60 धावांचं योगदान दिलं. कर्णधार हरमनप्रीत कौरला विशेष काही करता आलं नाही. ती केवळ 11 धावा करू शकली. अखेरच्या 6 षटकांत जेमिमाह रॉड्रिग्ज आणि ऋचा घोष यांनी शानदार फलंदाजी करत संघाची धावसंख्या 160 धावांच्या पुढे नेली. रॉड्रिग्जनं 16 चेंडूत 29 धावा केल्या तर ऋचा घोषनं 14 चेंडूत 40 धावांची विस्फोटक खेळी खेळली.
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेच्या संघाची सुरुवात खूपच खराब झाली. विश्मी गुणरत्ने अवघी एक धाव काढून बाद झाली. मात्र त्यानंतर कर्णधार चमारी अटापट्टू आणि हर्षिता समरविक्रमा यांच्यात 87 धावांची उत्कृष्ट भागीदारी झाली. 61 धावांच्या स्कोअरवर अटापट्टूला दीप्ती शर्मानं क्लीन बोल्ड केलं. त्यानंतर हर्षिता एक टोकावर क्रीजवर उभी राहीली. तिला कविशा दिलहरीची साथ मिळाली, जिनं 16 चेंडूत 30 धावांची तुफानी खेळी केली. हर्षितानं 51 चेंडूत 69 धावांची खेळी करत श्रीलंकेला 8 गडी राखून विजय मिळवून दिला.
महिला आशिया चषकाला 2004 मध्ये सुरुवात झाली होती. ही स्पर्धेची नववी आवृत्ती होती. भारतीय संघ आजपर्यंत झालेल्या सर्व महिला आशिया चषक स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. 2018 मध्ये भारताला फायनलमध्ये बांगलादेशकडून पराभव पत्करावा लागला होता. आता महिला आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताला पराभूत करणारा श्रीलंका दुसरा संघ बनला आहे.
हेही वाचा –
श्रीलंकेसाठी दोन्ही हातांनी गोलंदाजी करणारा कामिंदू मेंडिस पहिलाच गोलंदाज नव्हे; 28 वर्षांपूर्वीही झालंय असं
प्रशिक्षक गंभीरने पंतला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला का पाठवले? संघातील मित्राने सांगितले विशेष कारण
Asia Cup Final; फायनल सामन्यात स्म्रीती मानधनाचं शानदार अर्धशतक