भारत सध्या कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेच्या संकटाचा सामना करत आहे. या संकटात इंडियन प्रीमीयर लीगचा १४ वा हंगामही सापडला आहे. आयपीएलचा १४ वा हंगाम सुरु असतानाच कोरोना व्हायरसचा अचानक संघांच्या बायोबबलमध्ये प्रवेश झाला. त्यामुळे ही स्पर्धा २९ सामन्यांनतर अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआय आणि आयपीएल कमीटीने घेतला. हा हंगाम स्थगित झाल्यानंतर उर्वरित ३१ सामन्यांचे काय हा मोठा प्रश्न उभा आहे.
आयपीएलचे उर्वरित सामने खेळवायचे म्हटले तरी कुठे आणि कधी खेळवणार हा मोठा प्रश्न आहे. त्यातच बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने म्हटले आहे की आयपीएलचा हंगाम पुर्ण झाला नाही तर २५०० कोटींचे नुकसान होऊ शकते. दरम्यान असे वृत्त समोर येत आहे की श्रीलंका क्रिकेटने आयपीएलचा उर्वरित हंगामत सप्टेंबरमध्ये श्रीलंकेत आयोजित करण्याची ऑफर दिली आहे.
मागीलवर्षी देखील श्रीलंकेने आयपीएलचा १३ वा हंगाम आयोजित करण्याची इच्छा प्रकट केली होती. मात्र, बीसीसीआयने युएईमध्ये हा हंगाम आयोजित केला होता.
माध्यमांतील वृत्तानुसार, श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या मॅनेजिंक कमिटीचे अध्यक्ष अर्जुना डी सिल्वा यांनी म्हटले आहे की लंका प्रीमीयर लीगनंतर आयपीएलचे आयोजन करण्यास श्रीलंका सज्ज आहे. लंका प्रीमीयर लीग जुलै-ऑगस्टदरम्यान होणार आहे.
अर्जुना डी सिल्वा म्हणाले, ‘हो, आम्ही सप्टेंबर महिन्यात आयपीएलचे आयोजन करण्यासाठी विंडो उपलब्ध करुन देऊ शकतो. आम्ही ऐकले आहे की युएई हा एक पर्याय आहे. पण श्रीलंकेकडेही कोणत्याही कारणाने दुर्लक्ष करुन चालणार नाही.’
त्यांनी पुढे म्हटले आहे की ‘आम्ही लंका प्रीमीयर लीग जुलै-ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्याच्या योजना आखत आहोत. मैदाने आणि अन्य सुविधा सप्टेंबरमध्ये आयपीएलसाठी तयार आहेत.’
विशेष म्हणजे आयपीएल २०२१ हंगामात एकाही श्रीलंकेच्या खेळाडूचा समावेश नाही. श्रीलंकेचे मुथय्या मुरलीधरन, कुमार संगकारा आणि माहेला जयवर्धने हे माजी क्रिकेटपटू आयपीएलच्या ३ वेगवेगळ्या संघांच्या कोचिंग स्टाफचा भाग आहेत.
अर्जुन डी सिल्वाने जरी श्रीलंका आयपीएलच्या आयोजनासाठी पर्याय असल्याचे म्हटले असले तरी आता श्रीलंका क्रिकेट बोर्ड अधिकृतरित्या याबाबत बीसीसीआयला ऑफर देणार का, हे पाहावे लागणार आहे.
त्याचबरोबर, अशीही चर्चा आहे की इंग्लंडमधील कौऊंटी ग्रुपने देखील आयपीएल २०२१ हंगामातील उर्वरित सामने आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आता बीसीसीआय काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. त्यातच बीसीसीआयसमोर सध्या आयपीएलच्या आयोजनाबरोबरच ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या टी२० विश्वचषकाच्या आयोजनाचाही प्रश्न आहे.
भारतातील कोरोनाची परिस्थिती पाहाता हा विश्वचषक भारताऐवजी युएईमध्ये आयोजित केला जाऊ शकतो.
असे असले तरी अजून आयपीएलच्या आयोजनाबाबत किंवा टी२० विश्वचषकाबद्दलही कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. हे निर्णय येत्या काही महिन्यांत घेतले जातील. सध्या तरी अशी चर्चा आहे की टी२० विश्वचषकापूर्वी सप्टेंबरमध्ये काही काळ रिकामा असल्याने त्यावेळी आयपीएल २०२१ चे आयोजन होऊ शकते. पण त्यासाठी अन्य आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डांशीही चर्चा करावी लागेल.
महत्त्वाच्या बातम्या –