टी20 वर्ल्ड कप 2026 ची सुरुवात 7 फेब्रुवारीपासून होणार आहे. या स्पर्धेत (15 फेब्रुवारी) रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळवला जाईल. हा सामना कदाचित या स्पर्धेतील सर्वात ‘हाय व्होल्टेज’ सामना असेल. भारत-पाक दरम्यानचा हा सामना श्रीलंकेतील कोलंबो येथे खेळवला जाणार असून, या सामन्यासाठी श्रीलंकेकडून सुरक्षेवर विशेष लक्ष दिले जात आहे.
श्रीलंकेचे क्रीडा मंत्री सुनील कुमारा यांनी सांगितले की, सामन्यासाठी सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे, जेणेकरून स्पर्धेदरम्यान कोणतीही अडचण येऊ नये. एएफपी (AFP) या वृत्तसंस्थेशी बोलताना क्रीडा मंत्री म्हणाले, “आम्ही भारत-पाकिस्तान सामन्यावर विशेष लक्ष देत आहोत.” याशिवाय, दोन्ही संघांच्या सुरक्षेसाठी विशेष कमांडो युनिट्स तैनात केली जातील, असेही सांगण्यात आले आहे.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “विमानतळावरून बाहेर पडल्यापासून ते पुन्हा विमानात बसेपर्यंत, सशस्त्र रक्षक (Armed Guards) त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असतील.”
विशेष म्हणजे आगामी टी20 वर्ल्ड कप भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणार आहे. भारत आणि पाकिस्तानच्या संघांनी एकमेकांच्या देशात खेळणे बंद केले आहे, त्यामुळे स्पर्धेतील या दोन्ही संघांमधील सामना श्रीलंकेत खेळवला जाणार आहे. पाकिस्तान आपले सर्व सामने श्रीलंकेतच खेळणार आहे.
टी20 वर्ल्ड कपमधील भारत विरुद्ध पाकिस्तानच्या रेकॉर्डबद्दल बोलायचे झाले तर, आतापर्यंत या स्पर्धेत दोन्ही संघांमध्ये 8 सामने झाले आहेत. यापैकी टीम इंडियाने 7 सामन्यांत विजय मिळवला आहे, तर पाकिस्तानला केवळ 1 सामना जिंकता आला आहे.
तसेच भारत विरुद्ध पाकिस्तानच्या एकूण टी20 आंतरराष्ट्रीय रेकॉर्डचा विचार केला तर, दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत 16 टी20 सामने झाले आहेत. यामध्ये भारतीय संघाने वर्चस्व राखत 13 सामन्यांत विजय मिळवला आहे, तर पाकिस्तानला केवळ 3 सामने आपल्या नावावर करता आले आहेत.






