श्रीलंकेनं भारताविरुद्ध ऐतिहासिक वनडे मालिका जिंकून 24 तासही उलटले नाहीत, तर एक वाईट बातमी समोर आली आहे. श्रीलंकेचा युवा फिरकी गोलंदाज प्रवीण जयविक्रमा (25) याच्यावर फिक्सिंगचे आरोप लावण्यात आले आहेत. त्याच्यावर आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी तीन नियमांच्या उल्लंघनाचा आरोप ठेवण्यात आला आहे. सांगितलं जात आहे की, जयविक्रमानं 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय सामने आणि लंका प्रीमियर सीझन फिक्सिंगसाठी संपर्क केल्याची माहिती आयसीसीला लगेच दिली नाही.
आयसीसीच्या म्हणण्यानुसार, डावखुरा फिरकी गोलंदाज प्रवीण जयविक्रमानं 15 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, परंतु त्यानं त्याच्यासोबत झालेल्या दोन घटनांची माहिती दिली नाही. यापैकी एक घटना आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील फिक्सिंगशी, तर दुसरी 2021 लंका प्रीमियर लीगशी संबंधित आहे. जयविक्रमानं काही मेसेज डिलीट केल्यामुळे त्याच्यावर तपासात अडथळा आणल्याचा आरोपही लगावण्यात आला आहे.
प्रवीण जयविक्रमावर फिक्सिंगसाठी संपर्क साधल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक युनिटला सूचित करण्यास उशीर लावणे, लंका प्रीमियर लीगमध्ये दुसऱ्या खेळाडूशी संपर्क साधल्याबद्दल सूचित करण्यास उशीर करणे आणि यासंबंधीचे मॅसेज डिलीट करून तपासात अडथळा आणणे, हे आरोप आहेत. श्रीलंका क्रिकेटनं आयसीसीला या प्रकरणी कारवाई करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे. जयविक्रमाकडे या आरोपांना उत्तर देण्यासाठी 6 ऑगस्ट 2024 पासून 14 दिवसांचा अवधी आहे.
प्रवीण जयविक्रमानं 2021 मध्ये श्रीलंकेसाठी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. तो आंतरराष्ट्रीय स्तरावर श्रीलंकेसाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये 5-5 सामने खेळला आहे. प्रवीणनं कसोटीत 25, एकदिवसीयमध्ये 5 आणि टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 2 विकेट घेतल्या आहेत. मात्र, गेल्या दोन वर्षांत त्याला श्रीलंकेकडून एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही.
हेही वाचा –
शाहीन आफ्रिदीसोबत गेम झाला! बांगलादेशविरुद्धच्या कसोटीपूर्वी पीसीबीने दिला मोठा धक्का
वनडे मालिका गमावल्यानंतर टीम इंडियात होणार मोठे बदल! कर्णधार रोहितने दिला धक्कादायक इशारा
सनथ जयसूर्या 27 वर्षांनंतरही ‘काळ’ बनला, सचिन तेंडुलकरनंतर रोहित शर्माचेही स्वप्न धूळीत