---Advertisement---

श्रीलंका दौऱ्यात चमकले नाही तर ‘या’ खेळाडूंना संघातून मिळू शकतो नारळ

On: शनिवार, जून 26, 2021 9:46 PM
---Advertisement---

भारतीय संघ आगमी जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात ते तीन वनडे आणि तीन टी२० सामन्यांची मालिका खेळणार आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी२० विश्वचषकाच्या दृष्टीने ही मालिका महत्वाची आहे. विशेषतः भारताचा मुख्य संघ या काळात इंग्लंड दौऱ्यावर असल्याने युवा खेळाडूंना या दौऱ्यात संधी देण्यात आली आहे. त्यामुळे या संधीचा फायदा घेऊन आगामी विश्वचषकासाठी संघात स्थान पक्के करण्याचे त्यांचे ध्येय असेल.

मात्र या संघात तीन असेही खेळाडू आहेत ज्यांच्यासाठी या दौऱ्यात चांगले प्रदर्शन करणे, इतरांपेक्षाही महत्वाचे असेल. कारण या दौऱ्यातील साधारण कामगिरीने त्यांना विश्वचषकासाठीच्या भारतीय संघातील स्थान गमवावे लागू शकते. या लेखात आपण त्याच खेळाडूंबद्दल जाणून घेऊया.

१) युझवेंद्र चहल- या दौऱ्यात सर्वाधिक लक्ष लेगस्पिनर युझवेंद्र चहलकडे असेल. यापूर्वी इंग्लंडविरुद्ध झालेल्या ५ टी२० सामन्यांच्या मालिकेत त्याला संधी मिळाली होती. मात्र तो केवळ ३ गडी बाद करण्यात यशस्वी ठरला होता. यात त्याने १० पेक्षा अधिक इकोनॉमी रेटने धावा दिल्या होत्या. या कारणामुळे शेवटच्या दोन सामन्यात त्याच्या जागी राहुल चाहरला स्थान देण्यात आले होते. आता श्रीलंकेच्या फिरकीला अनुकूल असणाऱ्या खेळपट्टीवर त्याला आपला फॉर्म परत मिळवावा लागेल.

२) कुलदीप यादव- चायनामन फिरकी गोलंदाज कुलदीप यादव एकेकाळी भारतीय संघाचा सगळ्यात महत्वाचे अस्त्र होता. मात्र खराब कामगिरीमुळे मागील १७ महिन्यात तो भारताच्या टी२० संघातून बाहेर आहे. त्याने आपला शेवटचा सामना मागील वर्षी जानेवारी महिन्यात श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. त्याला यंदाच्या आयपीएल हंगामात देखील एकही सामना खेळायला मिळाला नाही. त्यामुळे त्याच्यासाठी संघातील स्थान परत मिळवण्यासाठी श्रीलंका दौरा अतिशय महत्वाचा असेल.

३) दीपक चाहर- दीपक चाहरने आपल्या टी२० कारकिर्दीची सुरवात शानदार केली होती. मात्र तो यात सातत्य राखू शकला नाही आणि त्याला संघातील स्थान गमवावे लागले. त्याने खेळलेल्या शेवटच्या ५ सामन्यात त्याने केवळ ३ गडी बाद केले आहेत. यातील ३ सामन्यात तर त्याला एकही गडी बाद करता आला नाही. त्यामुळे त्याच्यासाठी देखील लय परत मिळवण्यासाठी आणि विश्वचषकाच्या संघात स्थान मिळवण्यासाठी हा दौरा महत्वाचा आहे.

श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ- शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शाॅ, देवदत्त पड्डिकल, ऋतुराज गायकवाड, सुर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीश राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), राहुल चाहर, कृष्णाप्पा गाॅथम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुनवेश्वर कुमार (उपकर्णधार) दिपक चाहर, नवदीप सैनी, चेतन सकरिया

महत्त्वाच्या बातम्या – 

व्हिडिओ: ऐतिहासिक विजेतेपदानंतर किवी संघ परतला मायदेशी, मात्र ‘या’ गोष्टीचा सेलिब्रेशनमध्ये अडथळा

व्हिडिओ: भारतीय महिलांनी आपापसातच खेळली अनोखी स्पर्धा, पाहा कोण ठरलं विजयी

टी२०, कसोटीनंतर आता वनडेतही होणार शेफाली वर्माचे पदार्पण, ‘असे’ आहे इंग्लंविरुद्धच्या मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---