श्रीलंकेविरुद्ध २० ऑगस्ट पासून सुरु होणाऱ्या ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली. या संघात भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक एमएस धोनीचाही समावेश आहे.
काल धोनीच्या निवडीवर बोलताना एमएसके प्रसाद म्हणाले, ” आंद्रे आगाशीची खरी कारकीर्द ही ३० वयानंतर सुरु झाली. त्यानंतर त्याने अनेक विजेतेपदं जिंकली. धोनी काही असाच संघात आलेला नाही. परंतु तो कशी कामगिरी करतो हे पाहावे लागेल. ”
धोनीचा एकमेव स्पर्धेक असलेला रिषभ पंतवर बोलताना एमएसके प्रसाद म्हणाले, ” रिषभ पंतवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. त्याने दक्षिण आफ्रिका दौऱ्यात चांगली कामगिरी केली नाही. आम्ही त्याला टी२० सामन्यात आणखी संधी देऊ इच्छितो. आम्ही टी२० सामन्यातील त्याची कामगिरी पाहून त्याला पुढे संधी देण्याचा विचार करू. ”
एमएसके प्रसाद हे आजपर्यंतच्या भारतीय निवड समितीच्या अध्यक्षांपैकी एकमेव अध्यक्ष असतील जे प्रत्येक निवडीबद्दल स्पष्टीकरण देतात. त्यामुळे खेळाडूंना तसेच चाहत्यांना एखाद्या खेळाडूची का निवड झाली किंवा झाली नाही याबद्दल समजते.
यातून खेळाडूंमध्येही योग्य संदेश जातो की आपली निवड ही कोणत्या निकषांवर झाली आहे आणि जर आपण चांगली कामगिरी केली नाही तर याचे काय परिणाम होतील.