श्रीलंका विरुद्ध भारत संघातील बहुप्रतिक्षीत वनडे मालिकेला १८ जुलैपासून सुरुवात होत आहे. या मालिकेनंतर टी२० मालिका होणार आहे. या मालिकेपूर्वी दोन्ही संघांनी कसून सराव केला आहे. या मालिका भारतीय संघासाठी महत्त्वाच्या आहेत. कारण टी२० विश्वचषक सुरु होण्यापूर्वी भारताच्या मर्यादीत षटकांच्या या अखेरच्या मालिका असणार आहेत. तसेच भारतीय संघ अनेक युवा खेळाडूंसह या मालिका खेळणार आहे.
शिखर धवन पहिल्यांदाच कर्णधाराच्या भूमिकेत
एकिकडे भारताचा मर्यादीत षटकांचा संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे, तर दुसरीकडे भारताचा कसोटी संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यासाठी रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी असे अनेक अनुभवी खेळाडू अनुपलब्ध आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत श्रीलंका दौऱ्यासाठी अनेक युवा खेळाडूंना भारतीय संघात संधी मिळाली आहे.
यात चेतन साकारीया, ऋतुराज गायकवाड, नितीश राणा, वरुण चक्रवर्ती, देवदत्त पडीक्कल आणि कृष्णप्पा गॉथम या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संघी आहे. तसेच विराट आणि रोहित दोघेही अनुपलब्ध असल्याने शिखर धवनकडे कर्णधारपद देण्यात आले आहे, तर भुवनेश्वर कुमार उपकर्णधार असणार आहे. भारतीय संघाचे कोणत्याही क्रिकेट प्रकारात नेतृत्व करण्याची शिखरची ही पहिलीच वेळ असणार आहे.
तसेच या भारतीय संघात शिखर, भुवनेश्वर व्यतिरिक्त युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, दीपक चाहर, संजू सॅमसन असे काही आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव असणारे खेळाडू देखील आहेत.
भारत-श्रीलंका संघांची एकमेकांविरुद्धची वनडे क्रिकेटची आकडेवारी
भारत आणि श्रीलंका संघात रविवारपासून वनडे मालिका कोलंबोमधील आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो येथे सुरु होणार आहे, त्याआधी या दोन संघांची एकमेकांविरुद्ध वनडेतील कामगिरी कशी राहिली याचाही आढावा घेऊ.
हे दोन संघ आजपर्यंत १५९ वनडे सामन्यांत आमने-सामने आले आहेत. त्यातील ९१ सामन्यांत भारताने बाजी मारली आहे, तर श्रीलंकेने ५६ सामने जिंकले आहेत. तसेच या २ संघांतील १ सामना बरोबरीत सुटला असून ११ सामन्यांचा निकाल लागलेला नाही.
त्याचबरोबर श्रीलंकेमध्ये आजपर्यंत या दोन संघात आजपर्यंत ६१ वनडे सामने झाले आहेत, त्यातील २८ सामने भारताने जिंकले आहेत. तर २७ सामने श्रीलंकेने जिंकले आहेत. तसेच ६ सामन्यांचा निकाल लागलेला नाही. तसेच आर प्रेमदासा स्टेडियमवर या दोन संघात ३३ वनडे सामने झाले असून दोन्ही संघांनी प्रत्येकी १५ सामने जिंकले आहेत, तर ३ सामन्यांचा निकाल लागलेला नाही.
विशेष म्हणजे प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या वनडे सामन्यांत श्रीलंकेने भारताविरुद्ध अखेरचा विजय १२ सप्टेंबर २००९ रोजी म्हणजे जवळपास १२ वर्षांपूर्वी मिळवला आहे. त्यानंतर आत्तापर्यंत या मैदानात भारत आणि श्रीलंका संघात ५ वनडे सामने खेळवण्यात आले. या सर्व ५ सामन्यात भारताने विजय मिळवला आहे.
तसेच भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांमध्ये १९८२ सालामध्ये द्विपक्षीय वनडे मालिकेला प्रारंभ झाला होता. २०१७ मध्ये या दोन्ही संघांमध्ये शेवटची वनडे मालिका खेळली गेली होती. आतापर्यंत या दोन संघात खेळल्या गेलेल्या १८ द्विपक्षीय वनडे मालिकांपैकी भारतीय संघाला १३ मालिकेत विजय मिळवण्यात यश आले आहे. तर श्रीलंका संघाला अवघ्या २ मालिकेत विजय मिळवता आला आहे. यापैकी ३ मालिका अनिर्णीत राहिल्या आहेत.
श्रीलंका संघाने भारतीय संघाविरुद्ध खेळताना १९९७ मध्ये शेवटची वनडे मालिका जिंकली होती. यापूर्वी देखील १९९३ मध्ये त्यांनी भारतीय संघाचा पराभव केला होता. परंतु १९९७ नंतर श्रीलंका संघाला भारताविरुद्ध एकाही वनडे मालिकेत विजय मिळवण्यात यश आले नाही.
अशी होणार वनडे मालिका
भारताच्या श्रीलंका दौऱ्यातील सामन्यांना १८ जुलैपासून वनडे मालिकेने सुरुवात होईल. १८ जुलैनंतर २० आणि २३ जुलै रोजी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा वनडे सामना खेळला जाईल. हे तीनही वनडे आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवले जातील. तसेच भारतीय प्रमाणवेळेनुसार तिन्ही सामन्यांना दुपारी ३ वाजता सुरुवात होईल.
वनडे मालिकेसाठी दोन्ही संघ –
भारतीय संघ- शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शाॅ, देवदत्त पड्डिकल, ऋतुराज गायकवाड, सुर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीश राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), राहुल चाहर, के गाॅथम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुनवेश्वर कुमार (उपकर्णधार) दिपक चाहर, नवदीप सैनी, चेतन सकरिया, युजवेंद्र चहल.
श्रीलंका संघ – दसून शनका (कर्णधार), धनंजय डी सिल्वा, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षे, पथम निसान्का, चरिथ असलांका, वनिंदू हसरंगा, अशेन बंदरा, मिनोद भानुका, लाहिरू उडारा, रमेश मेंडिस, चमिका करुणारत्ने, दुशमंथा चमीरा, लक्षण संदकन, अकिला धनंजया, शिरन फर्नांडो, धनंजय लक्ष्मण, ईशान जयरत्ने, प्रवीण जयविक्रम, असिता फर्नांडो, कसून रजीता, लाहिरू कुमारा, इसुरु उडाना.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार असल्याचे कळताच ‘मौका मौका’ ट्रेंड, पाहा काही खास मीम्स
‘खरचं.. भारतीय संघाचा हेवा वाटतो, त्यांच्याकडे असे खेळाडू आहेत,’ विरोधी संघातून कौतुकाचा वर्षाव