जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरस महामारीदरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) श्रीलंका दौऱ्यावर युवा खेळाडूंना पाठवले होते. या दौऱ्यावर श्रीलंका संघाविरुद्ध भारतीय संघाने ३ सामन्यांची एकदिवसीय आणि ३ सामन्यांची टी२० मालिका खेळली आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाने श्रीलंका संघाविरूद्धची एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली आहे. तर टी२० मालिकेत भारतीय संघाला १-२ ने पराभूत व्हावे लागले.
श्रीलंकेच्या विजयात फिरकीपटू वानिंदू हसरंगा याचे मोठे योगदान राहिले. याच हसरंगाने नुकताच मोठी उलगडा केला आहे.
पहिल्या टी२० सामन्यानंतर भारताचा अष्टपैलू कृणाल पंड्याला कोरोनाची लागण झाली होती आणि यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या संघातील ८ मुख्य खेळाडूंनाही उर्वरित सामन्यांतून बाहेर जावे लागले होते. याचा फायदा श्रीलंकेच्या संघाचा फिरकीपटू हसरंगाला झाला. त्याने सर्वात चांगली गोलंदाजी केली होती. त्याने श्रीलंका संघाला उर्वरित दोन सामने जिंकून देत सर्वांनाच प्रभावित केले. आयसीसी टी२० क्रमवारीत त्याला याचा फायदाही मिळाला आणि तो जगातील नंबर २ गोलंदाज बनला आहे. त्याच्या याच कामगिरीने आयपीएल फ्रँचायझींचे लक्ष वेधले.
हसरंगाने नुकताच खुलासा केला आहे की, जेव्हा त्याच्या संघाने भारतीय संघाविरुद्ध टी२० मालिका जिंकली. तेव्हापासून त्याच्या आयुष्यात बरेच बदल झाले आहेत. जेव्हापासून त्याने भारतीय संघाविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तेव्हापासून दोन आयपीएल संघांनी त्याच्याशी संपर्क साधला आहे. इतकेच नव्हे तर, आयपीएल २०२१ च्या उर्वरित सामन्यांसाठी यूएईमध्ये सामने खेळण्याचा आग्रहही केला आहे.
मागील काही दिवसांपूर्वीच लसिथ मलिंगाच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना वनिंदू हसरंगाने सांगितले की,“भारतीय संघाविरुद्धच्या टी२० मालिकेनंतर आतापर्यंत दोन आयपीएल संघांनी माझ्याशी संपर्क साधला आहे. माझ्यासाठी ही लीग खेळणे आणि आयपीएलचा एक भाग होणे ही खूप मोठी गोष्ट आहे. या लीगचा एक भाग होण्याचे माझे स्वप्न आहे आणि एक दिवस त्यात खेळण्याचे माझे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल.”
आयपीएलच्या कोणत्या दोन संघांनी हसरंगाशी संपर्क साधला आहे आणि कोणत्या संघाशी तो संपर्क साधणार आहे? हे अजूनही निश्चित झालेले नाही. मात्र, यूएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात त्याचे खेळणे निश्चित होईल असे वाटत आहे. दरम्यान, अशाही बातम्या येत होत्या की, विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने हसरंगाशी संपर्क साधला आहे. मात्र अद्याप याची खात्री पटलेली नाही.
श्रीलंका-भारत टी२० मालिकेत हसरंगाने सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर मालिकावीर पुरस्कार देखील मिळाला आहे. या ३ सामन्यांच्या मालिकेत हसरंगाने ७ विकेट्स घेतल्या आहेत आणि फलंदाजीतही १३० च्या स्ट्राईक रेटने २९ धावांचे योगदान दिले आहे. या मालिकेत त्याचा इकोनॉमी रेट ६ पेक्षा कमी होता. यावरुन हे स्पष्ट होते की, भारतीय फलंदाजांना त्याला खेळणे कठीण होते.
एवढेच नाही तर मालिकेच्या अंतिम सामन्यात हसरंगाने भारतीय फलंदाजांवर दबाव निर्माण केला होता. त्याने अवघ्या ४ षटकांत ९ धावा देऊन ४ बळी घेतले होते. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारतीय संघ निर्धारित २० षटकांत ८ गडी गमावून केवळ ८१ धावा करू शकला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलची नवी नियमावली वाचलीत का? स्टँडमध्ये चेंडू गेल्यास त्याने नाही खेळला जाणार सामना
गौतम गंभीरने केली नव्या टी२० लीगची घोषणा, खेळाडूंना मिळणार ‘या’ सुविधा
दिनेश कार्तिक आता तमिळनाडूकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत नाही, ‘हा’ खेळाडू आहे त्याला कारण






