भारत आणि श्रीलंका यांच्यात येत्या १३ जुलैपासून वनडे मालिकेला प्रारंभ होणार होता. परंतु श्रीलंका संघाच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने ही मालिका पुढे ढकलण्यात आली आहे. ही मालिका १३ ऐवजी १७ जुलैपासून खेळवण्यात येणार आहे. तसेच या मालिकेदरम्यान श्रीलंका संघात आणखी काही मोठे बदल पाहायला मिळू शकतात.
माध्यमातील वृत्तांनुसार, बीसीसीआय सचिव जय शाह यांनी श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांसोबत चर्चा केली आहे. ज्यामध्ये वनडे आणि टी-२० मालिकेच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला आहे. दोन्ही मालिका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तसेच श्रीलंका क्रिकेट बोर्ड या दोन्ही मालिकांसाठी एक नवीन संघ मैदानात उतरवणार असल्याचे समजत आहे.
याचा अर्थ असा की, श्रीलंका संघातील जे खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर गेले होते, ते भारतीय संघाविरुद्ध खेळताना दिसून येणार नाहीत. परंतु याबाबत कुठलीही अधिकृत माहिती दिली गेली नाही. तसेच श्रीलंकन वेबसाईट आयलंड क्रिकेटने दिलेल्या माहितीनुसार, निवडकर्त्यांनी वनडे आणि टी-२० मालिकेसाठी २५ खेळाडूंची निवड केली आहे. यामध्ये कुसल परेराला कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले आहे. तर त्याच्याऐवजी दसून शनाकाला कर्णधारपद देण्यात आले आहे.
शुक्रवारी (९ जुलै) श्रीलंकन संघाचे डाटा विश्लेषक जीटी निरशन यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. तसेच एक दिवसापूर्वी श्रीलंकन संघाचे फलंदाजी प्रशिक्षक ग्रँड फ्लॉवर यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आली होती.
असे असेल भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक
वनडे मालिका
१)पहिला वनडे सामना – १७ जुलै
२) दुसरा वनडे सामना – १९ जुलै
३) तिसरा वनडे सामना – २१ जुलै
टी-२० मालिका
१) पहिला टी – २०सामना – २४ जुलै
२) दुसरा टी-२० सामना – २५ जुलै
३) तिसरा टी -२० सामना – २७ जुलै
भारतीय संघानेही श्रीलंका दौऱ्यावर आपला मुख्य संघ न पाठवता नवा संघ पाठवला आहे. या संघाचे नेतृत्त्वपद शिखर धवनच्या हाती असून भुवनेश्वर कुमार उपकर्णधार आहे. अशात श्रीलंकानेही त्यांच्या मुख्य संघाऐवजी नवा संघ मैदानावर उतरवला तर उभय संघात बरोबरीची टक्कर पाहायला मिळू शकते.
महत्वाच्या बातम्या-
इंग्लंडचा विजयासह श्रीगणेशा, पहिल्या टी२०त भारतीय संघाला १८ धावांनी दिला धोबीपछाड
नातेवाईकांच्या समजदारीमुळे वाचले सुनिल गावसकर, नाहीतर बनले असते थेट मच्छिमार
चालू सामन्यात चक्क अंपायरने कापले ‘लिटल मास्टर’ गावसकरांचे केस, वाचा तो किस्सा