कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे अखेर बीसीसीआयने आज आयपीएलचा चालू हंगाम रद्द करण्याचा निर्णय घेतला. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला देखील कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या गेल्या दोन दिवसांपासून येत होत्या. त्यामुळे काही सामने देखील तात्पुरते रद्द करण्यात आले होते. मात्र अखेर आज बीसीसीआयने संपूर्ण हंगामच रद्द करण्यात येत असल्याचा निर्णय जाहीर केला.
मात्र त्यांच्या या निर्णयाचा प्रक्षेपण वाहिनी असलेल्या स्टार स्पोर्ट्सला मोठा आर्थिक फटका बसला आहे. आयपीएलच्या हंगामातील अर्धे सामने पार पडले होते. तर उर्वरित सामने बाकी होते. मात्र ते रद्द झाल्याने स्टार स्पोर्ट्सला मोठा तोटा सहन करावा लागणार आहे.
जवळपास अडीचशे कोटींचा फटका बसण्याची शक्यता
स्टार स्पोर्ट्स वाहिनीकडे आयपीएलच्या प्रक्षेपणाचे अधिकृत हक्क होते. मात्र यंदा त्यांना अर्धाच हंगाम प्रक्षेपित करता आला आहे. त्यामुळे जाहिरातीतून मिळणारे उत्पन्न जवळपास ६० टक्क्यांनी रोडावले जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जाते आहे. जाहिरातदार केवळ प्रक्षेपित केल्या गेलेल्या जाहिरातींची रक्कम स्टार स्पोर्ट्सला अदा करणार असून उर्वरित कराराची रक्कम मात्र त्यांना देण्यात येणार नाही.
त्यामुळे आता तज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार स्टार स्पोर्ट्सला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. हा आकडा जवळपास दोनशे ते अडीचशे कोटींच्या घरात असण्याची शक्यता आहे. मात्र काहींनी व्यक्त केलेल्या मतानुसार हा तोटा बीसीसीआय आणि स्टार स्पोर्ट्स मध्ये विभागला जाण्याची शक्यता आहे.
प्लेऑफचे सामने रद्द झाल्याने अधिक नुकसान
आयपीएलचे बाद फेरीचे सामने रद्द झाल्याने स्टार स्पोर्ट्सचे अधिक नुकसान झाले आहे. कारण आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांना जाहिरातींचा दर कमी असतो. मात्र स्पर्धा उत्तरोत्तर रंगत जाते, तसा हा दर वाढत जातो. प्लेऑफच्या सामन्यांना म्हणजेच बाद फेरीच्या सामन्यांना जाहिरातींचे दर सर्वाधिक असतात. मात्र यंदा अर्ध्यात स्पर्धा स्थगित झाल्याने स्टार स्पोर्ट्सच्या नुकसानात भर पडली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
बीसीसीआयने आयपीएल २०२१चा हंगाम तुर्तास केला रद्द, जाणून घ्या उर्वरित सामने केव्हा आणि कुठे होणार?
कोरोनाने घेतला आयपीएल २०२१ हंगामाचा बळी, आतापर्यंत ‘एवढ्या’ खेळाडूंना झाली होती लागण






