कोरोना महामारीचा गेल्या वर्षी क्रिकेट जगतावर मोठा परिणाम झाला होता. टी२० विश्वचषकाव्यतिरिक्त, अनेक देशांमधील द्विपक्षीय मालिका रद्द कराव्या लागल्या होत्या. मात्र, ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कला मागच्या वर्षी स्वतः क्रिकेट खेळण्याची इच्छा नव्हती. स्टार्कची पत्नी आणि ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाची यष्टीरक्षक फलंदाज एलिसा हिलीने हा खुलासा केला आहे. काही वैयक्तिक कारणांमुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून बाजूला होण्याचा विचार करत होता, असे तिने म्हटले.
म्हणून स्टार्कला खेळायचे नव्हते क्रिकेट
स्टार्कची सहचारिणी असलेल्या एलिसाने ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट वाहिनीला सांगितले की, “स्टार्कला या वर्षी फेब्रुवारीमध्ये कर्करोगाने निधन झालेल्या आपल्या वडिलांसोबत काही वेळ घालवायचा होता. त्याला गेल्या वर्षी क्रिकेट खेळण्याची अजिबात इच्छा नव्हती. त्यावेळी काही महिन्यांत तो वडील पॉल यांच्यासोबत होता. त्याला क्रिकेट खेळून त्यांच्यापासून दूर जायचे नव्हते. मात्र, वडिलांना हे नको होते. आपल्या मुलाने ऑस्ट्रेलियासाठी क्रिकेट खेळावे आणि देशाचे नाव रोशन करावे ही त्याची इच्छा होती. वडिलांनी नेहमीच त्याला साथ दिलेली. वडिलांच्या या पाठिंब्यामुळे आणि प्रेमामुळे मिचेलने गेल्या उन्हाळ्यात ऑस्ट्रेलियाकडून क्रिकेट खेळले.”
भारताविरुद्धच्या मालिकेत केले खराब प्रदर्शन
वडिलांचे दुःख असले तरी, ते बाजूला ठेवून स्टार्क या वर्षाच्या सुरुवातीला भारतीय संघाविरुद्ध चार कसोटी सामन्यांची मालिका खेळला. या चार सामन्यात त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. तो केवळ ११ बळी मिळू शकला. तत्पूर्वी, भारताविरुद्धच्या टी२० मालिकेतील अखेरच्या दोन सामन्यातही त्याने सहभाग नोंदवला नव्हता. त्याच्या कसोटी मालिकेतील कामगिरीनंतर अनेकांनी त्याच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता एलिसाने या सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण दिले आहे. स्टार्क या महिन्यात सुरू होणाऱ्या टी२० विश्वचषकातऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीचे नेतृत्व करताना दिसेल.






