पुणे: 04 ऑगस्ट। समाजात सकारात्मक काम करणार्या संस्थांसाठी मदतीचा हात पुढे करणे हे राष्ट्रानिर्मितीच्या कार्यातील अंशदान असून अशा उदात्त हेतुसाठी पुनित बालन ग्रुप नेहमीच पुढे राहील. राज्यातील क्रीडा विश्वात अनेक चांगले हिरे आहेत त्यांना जवाहिर्याच्या हातात सोपवून योग्य वेळेत संधी मिळवून दिल्यास देशाच्या यशात नेत्रदीपक भर पडेल असे प्रतिपादन पुनित बालन यांनी केले. महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशनतर्फे आयोजित प्रशिक्षक शिबिराच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या समन्वयाने आणि पुनित बालन ग्रुप यांच्या सहकार्याने राज्य ज्यूदो संघटनेने म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिव छत्रपती क्रीडा संकुलात एक आठवडा कालावधीचे शिबिर आयोजिले होते. राज्यातील चंद्रपुर, गोंदिया, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, जळगाव, सिंधुदुर्ग यासह कोल्हापूर, औरंगाबाद, सोलापूर आदी 23 जिल्ह्यातील 43 ज्यूदो प्रशिक्षकांनी सहभाग घेतला होता.
यावेळी बालन पुढे म्हणाले की, “आता देशाला ऑलिंपिक, वर्ल्ड चॅपियनशिप्स, कॉमनवेल्थ गेम्स अशा आंतरराष्ट्रीय प्रमुख स्पर्धातील सुवर्णपदकांची अधिक अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीने आम्ही आमच्या परीने हातभार लावत आहोत. शिबिरासाठी राज्यातील दुर्गम भागातून आलेल्या ज्यूदो प्रशिक्षकांची संख्या पाहता आता ज्यूदो हा खेळ महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. ज्यूदो संघटनेच्या कार्याचे कौतुक करताना त्यांनी पुढील वर्षी राज्य संघटनेने फेडरेशनची परवानगी मिळवल्यास आपण संयुक्त रितीने पुण्यात राष्ट्रीय ज्यूदो स्पर्धांचे आयोजन करू असे आश्वासन बालन यांनी दिले.”
यावेळी व्यासपीठावर संघटनेचे रवी पाटील, सतीश पहाडे, रवी मेटकर, विकास पाटील हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश शेटकर तर आभार प्रदर्शन दत्ता आफळे यांनी केले. यावेळी मधुश्री देसाई, प्रज्ञा पाटील आणि विकास देसाई यांच्या चमूने स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके सादर केली.
संघटनेचे महासचिव शैलेश टिळक म्हणाले की, “या प्रथम स्तर शिबिर आयोजनाचा उद्देश सफल झाला असून आता संघटना प्रादेशिक स्तरावर शिबिरे आयोजित करून तज्ञ प्रशिक्षकांची संख्या वाढविण्यावर भर देईल. राज्य संघटनेकडे आंतरराष्ट्रीय खेळाडूंची संख्या वाढत असून त्यांना आता अधिक मोठ्या स्तरावर त्यांना प्रशिक्षण देण्याची गरज त्यांनी वर्तवली.”
कार्यक्रमात बँकॉक येथील आशियाई स्पर्धेत राज्याच्या समीक्षा शेलार हिने सातवा क्रमांक पटकावल्याबद्दल पुनित बालन यांच्या हस्ते तिचा सत्कार केला गेला. शिबिरामध्ये प्रशिक्षण देणार्या विजय पाटील, पूर्वा लोकरे, आशुतोष लोकरे, संपदा फालके, संकेत चाळके, तुषार सांगले, दयानन्द धाडवे, दीपक होले यांचा पुष्पगुच्छ देवून ऋणनिर्देश व्यक्त केला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
CWG 2022 | ऑस्ट्रेलियाची उपांत्य फेरीत धडक, पाकिस्तान ४४ धावांनी पराभूत; स्पर्धेतूनही बाहेर
सूर्याचा ‘तो’ षटकार पाहून कॉमेंटेटर्सही झाले शॉक, पुन: पुन्हा पाहावा असा आहे
सूर्यकुमार यादवची नवीन स्पोर्ट्स कार, वेस्ट इंडीजची धुलाई केल्यानंतर दिले स्वतःलाच गिफ्ट






