भारतीय क्रिकेट संघाला लाभलेला सर्वोत्तम कर्णधार, अशी ओळख एमएस धोनी य़ाची आहे. चाहत्यांकडून सर्वाधिक प्रेम मिळणारा भारतीय खेळाडू, असेही आपण धोनीबाबत म्हणू शकतो. गुरुवारी (7 जुलै) धोनी आपला 42वा वाढदिवस साजरा करणार आहे. याच पार्श्वभूमीवर आपण धोनीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर एक नजर टाकणार आहोत. कर्णधार म्हणून धोनीची आकडेवारी अक्षरशः डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे.
विराट कोहली (Virat Kohli) आणि सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) वगळता एमएस धोनी (MS Dhoni) भारताचा सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटू आहे. त्याने 2004 साली भारतासाठी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. बांगलादेशविरुद्धच्या वनडे सामन्यातून त्याला पदार्पणाची संधी मिळाली होती. त्यानंतर 2005 मध्ये श्रीलंकाविरुद्ध त्याने कसोटी पदार्पण केले, तर 2006 साली टी-20 क्रिकेटची सुरुवात झाल्यानंतर या फॉरमॅटमध्येही खेळू लागला. 2007 साली धोनीने पहिल्यांदा भारतीय संघाचे नेतृत्वे केले होते. त्याच्याच नेतृत्वात संघाला 2007 सालचा टी-20 विश्वचषक, 2011 साली वनडे विश्वचषक आणि 2013 साली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यात यश आले. या तिन्ही आयसीसी ट्रॉफी जिंकण्यामागे धोनीचा कर्णधार म्हणून महत्वाचा हात राहिला.
ऑगस्ट 2020 मध्ये धोनी भारतासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आणि एका इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून त्याने निवृत्ती जाहीर केली. धोनी भारतीय संघाचा सर्वोत्तम कर्णधार होता आणि जागतिक क्रिकेटमधील महान कर्णधारांपैकी एक. सर्वोत्तम फिनिशर अशी ओळख त्याने तयार केली होती.
कर्णधार म्हणून धोनीची कसोटी कारकीर्द –
धोनीच्याने तृत्वात भारतीय संघाने 60 कसोटी सामने खेळले आणि त्यापैकी 27 सामने जिंकले. 18 सामन्यांमध्ये भारतीय संघ पराभूत झाला, तर 15 सामने अनिर्णित राहिले. यादेशातील कसोटी सामन्यांमध्ये त्याची आकडेवारी जबरदस्त म्हणता येईल. त्याने भारतात 21 कसोटी सामने जिंकले. पण सेना देशांमध्ये (इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका) भारताच्या सुमार प्रदर्शनामुळे नेहमीच धोनीवर टीका झाली.
विराट कोहलीनंतर धोनी भारताचा दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार राहिला आहे. न्यूझीलंडमध्ये कसोटी मालिका जिकणारा तो केवळ दुसरा भारतीय कर्णधार ठरला होता. तसेच कसोटी क्रमवारीत भारताला पहिल्या क्रमांकावर घेऊन जाणारा पहिला कर्णधार देखील धोनीच आहे. एमएस धोनी चौथा असा कर्णधार ठरला होता, ज्याने ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत क्लीन स्वीप दिला होता. ही मालिका मायदेशात खेळली गेली असून भारताने 4-0 असा विजय मिळवला होता. कसोटी क्रिकेटमध्ये धोनी कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
कर्णधार म्हणून धोनीची वनडे कारकीर्द –
धोनी जागतिक क्रिकेटमध्ये स्रवोत्तम वनडे कर्णधारांपैकी एक राहिला आहे. त्याने भारतासाठी सर्वाधिक 200 वनडे सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आणि त्यापैकी 110 सामन्यात संघाला विजय मिळवून दिला. भारताला 74 वनडे सामन्यांमध्ये धोनीच्या नेतृत्वात पराभव स्वीकारावा लागला. राहिलेले 16 सामने अनिर्णित होते.
आकडेवारीच्या बाबतीत ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पाँटिंगनंतर धोनी दुसरा सर्वात यशस्वी वनडे कर्णधार आहे. पाँटिंगने 165 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला आहे. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामन्यात नेतृत्व करणाऱ्यांमध्ये धोनी तिसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर पाँटिंग आहे, ज्याने 230 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले आहे. दुसऱ्या क्रमांकावर स्टीफन फ्लेमिंग आहेत, ज्यांनी न्यूझीलंडसाठी 218 वनडे सामन्यात नेतृत्व केले. 200 सामन्यांसह धोनी या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
कर्णधार म्हणून धोनीची टी-20 कारकीर्द –
भारताचा सर्वात यशस्वी टी-20 कर्णधार धोनी आहे. त्याने 72 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आणि त्यापैकी 41 सामन्यात संघाला विजय मिळवून दिला. त्याच्या नेतृत्वात 28 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने भारताला गमवावे लागले. तीन सामने अनिकाली राहिले. या फॉरमॅटमध्ये धोनीच्या नेतृत्वातील संघाची जिंकण्याची शक्यता 58.33 राहिली आहे.
(Statistics of MS Dhoni as captain in Test, ODI and T20 cricket)
महत्वाच्या बातम्या –
भारतीय संघात पहिल्यांदाच निवड झालेल्या ‘या’ खेळाडूला सूर्याकडून शुभेच्छा; म्हणाला, ‘मी तुझ्यासाठी…’
पीसीबी अध्यक्षपदाची धुरा ‘या’ दिग्गजाच्या हाती, प्रत्येक गोष्टीसाठी घ्यावी लागणार पंतप्रधानांची परवानगी