पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर हा सातत्याने वादग्रस्त विधाने करत चर्चेत असतो. आपल्या क्रिकेट कारकीर्दीतही त्याचे वादांशी अनेकदा नाते राहिले आहे. नुकतेच त्याने एका क्रीडा प्रसारण वाहिनीशी बोलताना क्रिकेटविश्वातील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या भारताच्या सचिन तेंडुलकर याच्याविषयी एक विधान केले होते. मी जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा, मला सचिन तेंडुलकर कोण आहे? हे माहीत नव्हते असे त्याने म्हटलेले. सकलेन मुश्ताक व वसीम अक्रम यांनी आपल्याला याबाबत नंतर माहिती दिली, असे अख्तर म्हणालेला. मात्र, त्याच्या या विधानाचा आता अनेकजण समाचार घेत आहेत. जेव्हा अख्तरने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली तेव्हा सचिन चांगलाच प्रसिद्ध झाला होता, असे आकडे सांगत आहेत.
सचिन तेंडुलकरने १९८९ मध्ये पाकिस्तान दौ-यावर आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. तर अख्तरने आपला पहिला सामना वयाच्या २२ व्या वर्षी १९९७ मध्ये खेळला होता. याचाच अर्थ अख्तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये येईपर्यंत सचिन ८-९ वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत होता.
आकडेवारीचा विचार केल्यास स्पष्टपणे दिसून येईल की, सचिन हा त्या काळच्या उत्कृष्ट खेळाडूंमध्ये सामील झालेला. अख्तरने पदार्पण करेपर्यंत सचिनने ५८ कसोटीत ४००० पेक्षा जास्त धावा बनवलेल्या. त्याच्या नावावर १४ शतकेही जमा होती. वनडे क्रिकेटचा विचार केला गेल्यास सचिन १७३ सामन्यात सहा हजार धावा व १२ शतके ठोकून बसला होता.
या सर्वांचा विचार करता, एक गोष्ट नक्कीच सिद्ध होते की, आपण सचिनला ओळखत नव्हतो हे अख्तरचे विधान पूर्णपणे चुकीचे आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘पाकिस्तान विरुद्ध नाही, ट्रॉफी जिंकण्यासाठी खेळा’; टीम इंडियाला ‘दादा’ने दिला प्रेमाचा सल्ला
देशातील बड्या नेत्याच्या मुलाचं क्रिकेट असोसिएशनमधील मोठं पद जाणार! सुप्रिम कोर्ट ठरतंय अडथळा
‘बाबरचे वादळ रोखणं होतंय कठीण!’ मागील ८ पैकी ७ सामन्यात झळकावलंय अर्धशतक, वाचा रेकॉर्ड्स






