गोवा। हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात सोमवारी(28 डिसेंबर) जमशेदपूर एफसीने सनसनाटी निकाल नोंदवताना संभाव्य विजेत्या बेंगळुरू एफसीवर 1-0 अशी मात केली. दुसऱ्या सत्रात स्टीफन इझे याने केलेला गोल निर्णायक ठरला.
फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर हा सामना झाला. मध्यंतरास गोलशून्य बरोबरी होती. दुसऱ्या सत्रात 79व्या मिनिटाला जमशेदपूरचे खाते बचाव फळीतील नायजेरियाचा 26 वर्षीय आंतरराष्ट्रीय खेळाडू स्टीफन इझे याने उघडले. हा गोल विजयी ठरला.
जमशेदपूरने 9 सामन्यांत तिसरा विजय मिळवला असून चार बरोबरी व दोन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 13 गुण झाले. त्यांनी सहावरून तीन क्रमांक झेप घेत तिसरे स्थान गाठले. या लढतीआधी तिसऱ्या स्थानावर असलेल्या बेंगळुरूची चौथ्या क्रमांकावर घसरण झाली.
स्पेनच्या कार्लेस कुआद्रात यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या बेंगळुरूला 8 सामन्यांत दुसराच पराभव पत्करावा लागला असून तीन विजय व तीन बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे 12 गुण कायम राहिले.
मुंबई सिटी एफसी सात सामन्यांतून 16 गुणांसह सरस गोलफरकामुळे आघाडीवर आहे. दुसऱ्या क्रमांकावरील एटीके मोहन बागानचेही सात सामन्यांतून 16 गुण आहेत. यात मुंबईचा 8 (11-3) गोलफरक एटीकेएमबीच्या 5 (8-3) गोलफरकापेक्षा तीनने सरस आहे. नॉर्थईस्ट युनायटेड एफसी व एफसी गोवा यांची 8 सामन्यांतून 11 गुण अशी समान कामगिरी आहे. यात नॉर्थईस्टचा 2 (10-8) गोलफरक गोव्याच्या 1 (10-9) गोलफरकापेक्षा सरस आहे. त्यामुळे नॉर्थईस्ट पाचव्या स्थानावर आहे.
ओवेन कॉयल यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या जमशेदपूरसाठी 79व्या मिनिटाला मध्य फळीतील अलेक्झांड्रे लिमा याने डावीकडून चाल रचली. त्याने बेंगळुरूचा बचाव भेदत उजव्या बाजूला असलेला आघाडी फळीतील सहकारी अनिकेत जाधव याच्या दिशेने चेंडू मारला. अनिकेतने चेंडूवर नियंत्रण मिळवत क्रॉस शॉट मारला. मग स्टीफनने हेडिंगवर लक्ष्य साधत बेंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू याला चकवले.
सामन्याची सुरवात सकारात्मक झाली. दुसऱ्या मिनिटाला जमशेदपूरचा मध्यरक्षक अलेक्झांड्रे लिमा याने त्याच्या संघाच्या बॉक्सलगत अकारण फ्री किक दिली. बेंगळुरूचा फॉरवर्ड क्रिस्तीयन ओप्सेथ याने त्यावर मारलेला चेंडू थेट प्रतिस्पर्धी गोलरक्षक टी. पी. रेहेनेश याच्या दिशेने गेला. रेहेनेशने चेंडू थोपवत बाहेर घालवला. त्यामुळे मिळालेला कॉर्नर मध्यरक्षक डिमास डेल्गाडोने घेतला, पण त्यावर काही विशेष घडले नाही.
सातव्या मिनिटाला जमशेदपूरचा स्ट्रायकर अनिकेत जाधव याला उजवीकडे चेंडू मिळाला. त्याने बॉक्समध्ये क्रॉस शॉट मारला, पण नेरीयूस वॅल्सकीस चेंडू वेळीच ताब्यात मिळवू शखला नाही.
अकराव्या मिनिटाला बेंगळुरूचा मध्यरक्षक सुरेश वांगजाम याने मध्य रेषेपाशी चेंडूवर ताबा मिळवला. कर्णधार सुनील छेत्रीने त्याच्या धावगतीनुसार उजवीकडून मुसंडी मारली. छेत्रीने पास मिळताच फटका मारला, पण प्रतिस्पर्धी खेळाडूच्या अंगाला लागून चेंडू बाहेर गेला. त्यातून मिळालेल्या कॉर्नरवर काही घडले नाही.
दुसऱ्या सत्रात बेंगळुरूकडून काही चांगले प्रयत्न झाले. 56व्या मिनिटाला मध्य फळीतील जुआनन याने मध्य क्षेत्रातून छेत्रीला बॉक्समध्ये पास दिला, पण छेत्री नेटच्या दिशेने शॉट मारण्यात थोडक्यात चकला.
85व्या मिनिटाला जुआनन याने घेतलेल्या कॉर्नरवर बेंगळुरूचा बचावपटू राहुल भेके याने हेडिंगवर प्रयत्न केला, पण रेहेनेशने मुठींचा प्रहार करीत चेंडू दूर घालवला.