---Advertisement---

धोनीच्या खेळीला ‘टेस्ट इनिंग’ म्हणणाऱ्यांना फ्लेमिंगने सुनावले, म्हणाला…

On: मंगळवार, ऑक्टोबर 5, 2021 7:11 PM
---Advertisement---

दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सोमवारी (४ ऑक्टोबर) इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल २०२१) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळाला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने शेवटच्या षटकात ३ गडी राखून विजय मिळवला. दिल्लीने या सामन्यात विजय मिळवला असला तरी, चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी याने केलेल्या संथ खेळीची सगळीकडे चर्चा होती. सोशल मीडियावर त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले गेले. धोनीवर टीका होत असताना संघाचा मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग त्याची पाठराखण करताना दिसून आला.

धोनीची संथ खेळी
गुणतालिकेतील पहिले स्थान पटकावण्याच्या इराद्याने महत्त्वाच्या असलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना धोनीने २७ चेंडूत १८ धावा केल्या. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट ६६.६७ असा मामुली राहिला. ही त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वात संथ खेळी ठरली. यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी त्याला टी२० क्रिकेट खेळणारा कसोटीपटू म्हणून हिणवले. धोनीच्‍या छायाचित्रावर अनेक मीमदेखील बनविले. काहींनी तर चेन्नईची जर्सी कसोटी जर्सीमध्ये बदलत त्याच्यावर टीका केली.

फ्लेमिंगने केली पाठराखण
धोनीच्या या खेळीवर टीका करणाऱ्यांना संघाचा मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग याने पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले,
“या खेळपट्टीवर मोठे फटके खेळणे अवघड होते. एकट्या धोनीनेच या खेळपट्टीवर संघर्ष केला नाही. सामना अत्यंत अटीतटीच्या झाला. १३७ धावांचे आव्हान पूर्ण करण्यासाठी अखेरचे षटक सुरु व्हावे लागले. स्पर्धेतील सर्व खेळपट्ट्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत.”
चेन्नईला आपला अखेरचा सामना ७ ऑक्टोबर रोजी पंजाब किंग्सविरुद्ध खेळायचा आहे. हा सामना जिंकून चेन्नई अव्वल दोनमध्ये राहण्याचा प्रयत्न करेल. चेन्नईने यापूर्वीच प्ले ऑफसाठी पात्रता मिळविली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---