ग्रीक दंतकथांपैकी एक असलेली फिनिक्स पक्षाची गोष्ट अनेकांनी लहानपणापासून ऐकली असेल. आपले आयुमान पूर्ण झाल्यावर हा पक्षी स्वतःला जाळून घेतो आणि नंतर त्याच राखेतून त्याचा जन्म होतो अशी ही छोटीशी कथा. मानवी आयुष्यातही कोणाला प्रेरणा द्यायची असली तर ‘फिनिक्स भरारी’ हा शब्द आपण अनेकदा ऐकतो किंवा वाचतो. क्रिकेटजगतात या फिनिक्स पक्षाची तुलना करायची झाल्यास एक नाव सर्वप्रथम डोळ्यासमोर येते, ते नाव म्हणजे ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथ.
‘क्लास ऑफ २००८’ चा सदस्य
सन २००७ मध्ये ऑस्ट्रेलियाचा सर्वकालीन महान लेगस्पिनर शेन वॉर्न याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला. त्याची दर्जेदार फिरकीची परंपरा पुढे चालवण्यासाठी जेसन क्रेझा हा डावखुरा फिरकीपटू पुढे आलेला. मात्र, त्याच काळात न्यू साउथ वेल्सचा स्मिथ हा लेगस्पिनर म्हणून पुढे आलेला. वयोगट स्पर्धेत त्याने चांगले नाव कमावले होते. ज्या २००८ च्या एकोणीस वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला विराट कोहली, केन विलियम्सन, रवींद्र जडेजा, ट्रेंट बोल्ट आणि अन्य अप्रतिम खेळाडू दिले त्यात स्मिथचा देखील समावेश होता. त्या संपूर्ण विश्वचषकात ४ सामने खेळताना ११४ धावा व ७ बळी अशी सरासरी अष्टपैलू कामगिरी त्याने नोंदविलेली. युवा संघासोबत केलेली कामगिरी त्याने पुढे न्यू साउथ वेल्ससाठी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्येदेखील केली आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आगमनास आपण तयार असल्याचे छातीठोकपणे सांगितले.
टी२० विश्वचषकातील सर्वोत्तम गोलंदाज
स्मिथने २०१० मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध आधी टी२० व त्यानंतर वनडेमध्ये पदार्पण केले. यामध्ये तो संघाचा प्रमुख लेगस्पिनर म्हणून सहभागी झालेला. स्मिथची खरी चर्चा झाली ती त्या वर्षीच्या टी२० विश्वचषकात. विश्वास बसणार नाही मात्र, सध्या जगातील अव्वल फलंदाज असलेला स्मिथ त्या स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता. गोलंदाज म्हणून नाव कमावत असलेला स्मिथ एक चपळ क्षेत्ररक्षक देखील म्हणून नावाजला जाऊ लागलेला. २०१०-२०११ च्या ऍशेसमध्ये सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने देखणी कामगिरी केली. मात्र, त्यानंतरही त्याला नियमितपणे कसोटी संघात जागा मिळाली नाही.
फलंदाज म्हणून केले स्वतःला सिद्ध
जवळपास दोन वर्ष कसोटी संघातून बाहेर राहिल्यानंतर २०१३ मध्ये भारत दौऱ्यातून त्याने पुनरागमन केले. या दौर्यात त्याची कामगिरी ठीक-ठाक झाली. मात्र, त्यानंतर लागोपाठ दोन ऍशेस त्याने गाजवल्या. मिचेल जॉन्सनच्या दहशती गोलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या त्या ऍशेसमधून क्रिकेटप्रेमींना ‘स्टीव्ह स्मिथ द बॅट्समन’ पाहायला मिळू लागला. दक्षिण आफ्रिका दौरा त्याच्याच नावे राहिला. २०१४ च्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये तर त्याने भारतीय गोलंदाजांना अक्षरशः पळता भुई थोडी केली. मालिकेतील चारही कसोटीमध्ये त्याने शतके झळकावली. या मालिकेत त्याने १२८ च्या सरासरीने ७६९ धावा चोपल्या होत्या. चार वर्षांपूर्वी ज्याला शेन वॉर्नचा वारसदार म्हटले जात होते, तो स्मिथ डॉन ब्रॅडमन यांचा वारसदार असल्याचे सिद्ध झाले होते. आपल्या फलंदाजीच्या विचित्र शैलीने जगभरातील गोलंदाजांसाठी तो एक कोडे बनून राहिला.
कर्णधार म्हणून देखणी कामगिरी
दिग्गज मायकल क्लार्क निवृत्त झाल्यानंतर २०१५ मध्ये स्मिथ ऑस्ट्रेलियाचा पूर्णवेळ कर्णधार बनला. फलंदाज म्हणून धमाकेदार कामगिरी केल्यानंतर कर्णधार झाल्यावर देखील त्याचा ‘मिडास टच’ कायम राहीला. २०१७ आयपीएलमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंटने एमएस धोनीला कर्णधारपदावरून काढले, त्यावेळी त्याचा उत्तराधिकारी म्हणून स्मिथची निवड केली गेली. त्यानेदेखील संघ व्यवस्थापनाला नाराज न करता संघाला अंतिम फेरीत पोहोचवले. २०१८ पर्यंत नेतृत्व करत असताना तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या विजयाची सरासरी ५० टक्क्यांपेक्षा जास्त होती.
बॉल टेम्परिंग प्रकरण भोवले
ऑस्ट्रेलियाचा संघ २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला होता. केपटाऊन कसोटीत ऑस्ट्रेलियाचा युवा खेळाडू कॅमेरून बेनक्रॉफ्ट हा चेंडूवर सॅंडपेपर घासताना आढळून आला. हे बॉल टेम्परिंगचे गंभीर प्रकरण होते. या प्रकरणाची चौकशी झाली असता कर्णधार स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांना प्रत्येकी १२ महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले. ऑस्ट्रेलियात परतल्यानंतर विमानतळावरच त्याने पत्रकार परिषद घेत या सर्वाची जबाबदारी स्वीकारली. त्या पत्रकार परिषदेत ढसाढसा रडणारा स्मिथ आजही क्रिकेटप्रेमींना आठवतो.
फिनिक्स भरारी
बॉल टेम्परिंग प्रकरणी निलंबन पूर्ण केल्यानंतर स्मिथने आधी आयपीएलमधून स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये आणि त्यानंतर २०१९ क्रिकेट विश्वचषकातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. या विश्वचषकात ३५० पेक्षा जास्त धावा काढून आपण फॉर्ममध्ये असल्याचे त्याने दाखवून दिले.
विश्वचषकानंतर स्मिथची खरी परीक्षा होती ती ऍशेसमध्ये. ब्रिटीश मिडिया आणि प्रेक्षकांनी त्याला लक्ष्य केले होते. परंतु, एजबॅस्टन येथे झालेल्या पहिल्या कसोटीत दोन्ही डावात त्याने शतके ठोकत सर्वांची तोंडे बंद केली. दुसऱ्या कसोटीत जोफ्रा आर्चरचा चेंडू हेल्मेटवर लागल्याने त्याला सामन्यातून बाहेर पडावे लागले. याच सामन्यात मार्नस लॅब्युशेन हा क्रिकेट इतिहासातील पहिला कन्कशन सबस्टीट्यूट म्हणून मैदानात उतरला. तिसऱ्या सामन्यातही स्मिथनेही दुहेरी शतक ठोकले आणि आपल्याला या पिढीतील महान फलंदाज का म्हटले जातो, याचे सप्रमाण उदाहरण दिले.
कसोटी क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट
स्मिथ २०१३ पासून कसोटी क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट असल्याचे मिळालेल्या पुरस्कारांवरून स्पष्ट दिसते. दोन वेळा आयसीसीचा सर्वोत्तम कसोटीपटू, एकदा वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, तीन वेळा सर्वोत्तम ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू तसेच, दोन वेळा ऍशेसमधील मालिकावीर असे पुरस्कार त्याच्या नावे आहेत. २०११-२०२१ या कालावधीसाठी त्याला आयसीसीने सर्वोत्तम कसोटीपटू म्हणून घोषित केले.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही देशांचे नागरिकत्व असताना ऑस्ट्रेलियासाठी खेळण्याचा त्याचा निर्णय ऑस्ट्रेलियाला आणखी एक दिग्गज देऊन गेला. २०१५ विश्वचषकात विजयी फटका मारल्यानंतर शेन वॉटसनच्या अंगावर टुणकन उडी मारून बसलेला स्मिथ कोणीही विसरणार नाही. सध्या कारकीर्दीच्या शिखरावर असलेला स्मिथ आणखी काही वर्षे नक्कीच ऑस्ट्रेलियाच्या उज्वल क्रिकेट परंपरेची पताका नक्कीच उंच ठेवेल.
महत्त्वाच्या बातम्या –
दीपक चाहर चढला बोहल्यावर, लाईव्ह सामन्यात मागणी घातलेल्या प्रेयसीबरोबर थाटला संसार, Photo व्हायरल
हुश्श! गांगुली सोडणार नाही अध्यक्षपद, ट्वीटमागे होतं ‘हे’ कारण
‘तो’ म्हणाला होता, ‘माझा मृत्यू विमान अपघातात होईल आणि मी स्वर्गात जाईल’; २ वर्षांनी बरोबर तसेच घडले






