fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

स्मिथ, वॉर्नरच्या आयपीएल खेळण्यावरही बंदी 

ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी केलेले चेंडू छेडछाड प्रकरणाचे पडसाद आता संपूर्ण क्रिकेट जगतावर उमटताना दिसू लागले आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या घटनेनेनंतर आज अनेक कठोर निर्णय घेताना या प्रकरणात दोषी असलेले स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरॉन बॅनक्रोफ्ट या तीन खेळाडूंवर निलंबनाची कारवाई केली आहे. 

त्यामुळे चेंडू छेडछाड प्रकरणात अडकलेल्या स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यासमोरील संकटे वाढत चालली आहेत. या प्रकरणानंतर स्मिथ आणि वॉर्नर या दोघांनाही आयपीएलमधील त्यांच्या संघांचे कर्णधारपद सोडावे लागले आहे. पण आता बीसीसीआयनेही त्यांच्या आयपीएल खेळण्यावर बंदी घातली आहे.

याबद्दल बीसीसीआयने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की “बीसीसीआयचे कार्यकारी अध्यक्ष सीके खन्ना, आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला आणि कार्यकारी सचिव अमिताभ चौधरी यांच्याशी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीने या प्रकरणाबद्दल चर्चा केली आहे. तसेच या चर्चेनंतर सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीने स्मिथ आणि वॉर्नरच्या आयपीएल २०१८ च्या सहभागावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.”

“बीसीसीआयला आशा आहे की आयपीएलमधील खेळाडू आचारसंहिता, क्रीडाभवना आणि सामानाधिकारी यांचा आदर करतील.”

https://twitter.com/ICC/status/978930653910663169

या निर्णयामुळे आयपीएल सुरु होण्याआधीच राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैद्राबाद या दोन संघांना मोठे धक्के बसले आहेत. या दोन्ही संघांनी अनुक्रमे स्मिथ आणि वॉर्नरला आयपीएल लिलावाआधी संघात कायम ठेवले होते. 

पण आता या दोन्ही खेळाडूंवर आलेल्या बंदीमुळे बीसीसीआयने राजस्थान आणि हैद्राबाद या संघांना त्यांचे बदली खेळाडू घेण्याची परवानगी दिली आहे. 

चेंडू छेडछाड प्रकरणानंतर लगेचच स्मिथने राजस्थान संघाचे कर्णधारपद सोडले होते. त्यामुळे अजिंक्य राहणेकडे राजस्थानच्या संघाची जबाबदारी सोपवण्यात आली. तर वॉर्नर आज हैद्राबाद संघाच्या कर्णधार पदावरून पायउतार झाला आहे. त्यामुळे अजून हैद्राबादने नवीन कर्णधाराचे नाव घोषित केलेले नाही. 

You might also like