fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

ब्लाॅग: स्मिथ, तो खरंच तू आहेस का?

-प्रणाली कोद्रे

स्टीव्हन स्मिथ, जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असणारा. खरं तर आम्ही क्रिकेट चाहते तुझ्या याच खेळावर मनापासून प्रेम करतो. पण २४ मार्च, शनिवारी रात्री तुझा चेंडू छेडछाड प्रकरणात असलेला सहभाग ऐकला आणि कुठेतरी मनात तुझा राग येण्यापेक्षा वाईट वाटलं. तुझ्यासारखा खेळाडू हे करू शकतो? तो खरंच तू आहेस? यावर सुरवातीला विश्वास ठेवणेच अवघड गेलं. मी एक क्रीडा पत्रकार म्हणून मला या लाजिरवाण्या चेंडू छेडछाड प्रकरणावर बातमी देणं भाग होत. पण त्याचवेळी एक क्रिकेटप्रेमी म्हणून खूप वाईट वाटत होत. तू ही चूक केलीस आणि ती मान्यही केलीस. पण तुझ्या या सगळ्याच मैदानावरील गैरवर्तनामुळे तू क्रिकेट चाहत्यांच्या मनातल्या तुझ्या प्रतिष्ठेला मोठा धक्का दिलास.

तू एक फलंदाज म्हणून नक्कीच दिग्गज आहेस आणि यावर कोणी शंका घेईल असे वाटतही नाही. पण तू एक खेळाडू म्हणून आणि त्यापेक्षा एक कर्णधार म्हणून कुठेतरी कमी पडलास. त्याचमुळे तुला जे झालं त्याला सामोरे जावे लागणार आहे. एक वर्षांसाठी तुला क्रिकेटपासून लांब राहावा लागणार आहे. म्हणजेच आम्हा चाहत्यांना तुला एक वर्ष खेळताना बघता येणार नाहीये.

अरे, काही महिन्यांपूर्वीच तर तुला आयसीसीने सर्वोत्तम क्रिकेटपटूंचा पुरस्कार दिला होता. क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही तुला मानाचे बॉर्डर मेडल देऊन सन्मानित केलं होत. असं असतानाही तुला चेंडू छेडछाडीसारखा प्रकार करावासा वाटला? खरंतर तू मागच्या वर्षी भारतात आला होता तेव्हा ब्रेनफेड प्रकरण गाजल होत. पण त्याचवेळी तू केलेल्या त्या खडूस खेळीचं कौतुकही वाटलं.

त्यावेळेसचच कशाला नुकत्याच पार पडलेल्या ऍशेस मालिकेत तुझी कामगिरी काय मस्त झाली. तुझ्या अशाच फलंदाजीसाठी तुला आज ऑस्ट्रेलियात डॉन ब्रॅडमन नंतरचा महान खेळाडू मानलं जात. आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियाने नेहेमीच महान कर्णधारांना पुढे आणले आहेत. त्याच पंक्तीत तुला बसण्याची संधी होती. तू ज्या प्रकारे अनेक यशाची शिखरे पार करत आहेस ते आमच्यासाठी नकीच कौतुकास्पद आहे. पण खरंच तूझ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील चेंडू छेडछाड प्रकरणातील सहभागाने सर्वांना धक्का दिलास.

तू जेव्हा मागच्या वर्षी जेव्हा भारतात खेळायला आला होता ना त्यावेळी तुझी फलंदाजी म्हणजे भारतीय गोलंदाजांच्या डोक्याला ताप झाला होता. त्यातच ब्रेनफेड प्रकरण झालं. त्यानंतर काही दिवसातच आयपीएल २०१७ साठी तुझी एमएस धोनी ऐवजी रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाच्या कर्णधारपदी निवड झाली. तुला या संघाचं नेतृत्व करायला मिळालं आणि हेच कर्णधारपद तुला भारतीय चाहत्यांच्या मनात सन्मानाची जागा मिळवण्यासाठी महत्वाचं ठरलं.

सोशल मीडियावर तर तुला या संघाचं कर्णधारपद मिळालं म्हणून प्रचंड प्रमाणात टीकाही झाली. पण तू या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून आम्हा भारतीयांवर जी जादू केलीस ती खरंच खूप भारी होती. तू ज्या प्रकारे पुण्याच्या संघाचा डोलारा संभाळलास आणि फक्त संभायला नाहीस तर पुण्याच्या संघाला अंतिम सामन्यात अंतिम सामन्यात घेऊन गेलास. त्यावेळी तू सगळ्यांची मने जिंकली होती.

त्यावेळी एका अशा संघाचं तू नेतृत्व तू केल होत, ज्या संघावर कोणाचाही फारसा विश्वास नव्हता. अंतिम सामन्यात जेव्हा पुण्याला फक्त एका धावेने पराभूत व्हावे लागले तेव्हा तुझ्या चेहऱ्यावरची निराशा स्पष्ट दिसत होती. तू पुण्याच्या संघासाठी घेतलेले कष्ट दिसत होते. तू पुन्हा आमच्या मनात तुझ्याबद्दल आदराची जागा मिळवली होती. पण तू आज जे काही केल त्यावरून तो तूच होतास का हा प्रश्न आमच्या मनात उभा राहिला.

चेंडू छेडछाड प्रकरणानंतर माझ्या एका मैत्रिणीने मला एक मेसेज केला होता. ज्यात तिने मला म्हटलं होत, ‘स्मिथला खूप मोठी शिक्षा तर नाही होणार ना? तो माझा फेव्हरिट प्लेअर आहे.’ त्यानंतर खरंच माझ्या मनात विचार येऊन गेला, स्मिथ तुझ्यावर किती चाहते प्रेम करतात. तुझ्या खेळावर किती लोकांचे लक्ष आहे. पण तू आज या सगळ्यांच्याच विश्वासाला तडा दिला. तू आज एक खेळाडूंपेक्षा कर्णधार म्हणून जे वागलास आणि तू जे काही केलस ते पूर्ण योजनेने केल, हेच सर्वात जास्त धक्कादायक होत.

हो, पण एक गोष्टही मान्य करावी लागेल. या आधीही क्रिकेट विश्वात अशा गोष्टी घडल्या आहेत. अगदी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड अशा सभ्य खेळाडूंकडूनही अशा चुका घडल्या. त्याही चूकच होत्या आणि तू केलीस तीही चूकच आहे. पण फरक पडला तो सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावाचा. तुझ्याबाबतीत सोशल मीडियावर ज्या चर्चा रंगल्या त्याला कोणतीच सीमा नव्हती. याचमुळे तू केलेली चूक जास्त गांभीर्याने सर्वांना समजली आणि त्यातून सर्वांनी शिकवणही घेतली असेल.

स्मिथ, तू नक्कीच एक चांगला फलंदाज आहेस, पण तू एक चांगला खेळाडू म्हणूनही सर्वांसमोर यावा, अशीच आमची इच्छा आहे. झाल्या प्रकरणातून तुला खूप काही शिकायला मिळाल असेल. तू अजूनही आमच्यासाठी एक सर्वोत्तम फलंदाज आहेस. तुझ्यासारखी क्षमता असणाऱ्या फलंदाजाची आजही क्रिकेटला गरज आहे. कारण तुझयासारखे फलंदाज खूप क्वचित पाहायला मिळतात. स्मिथ तुला अजूनही खेळताना आम्हाला पाहायचे आहे पण फक्त एक चांगला फलंदाज म्हणून नाही तर एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून. त्यावेळी तुझी उत्तम कामगिरी बघून आम्ही खेदाने नाही तर अभिमानाने म्हणू शकू कि तो चेंडू छेडछाड प्रकरणात अडकलेला आणि एक वर्षांच्या पुनरागमानंतरचा स्मिथ तो तूच आहेस का?

या लेखावर आपल्या प्रतिक्रिया देण्यासाठी- 

महा स्पोर्ट्सचे ट्विटर- @Maha_Sports

लेखकाचे ट्विटर- Pranali_k18

 

You might also like