दक्षिण आफ्रिका विरुद्ध केपटाऊन येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी केलेले चेंडू छेडछाड प्रकरण चांगलेच गाजले होते. यात दोषी आढळलेले ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरॉन बॅनक्रोफ्ट यांच्यांवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बंदीही घातली आहे.
या बंदीनंतर या तीनही खेळाडूंना त्यांच्यावर झालेल्या कारवाईविरुद्ध अपील करण्याची परवानगी होती. मात्र आज स्मिथ आणि बॅनक्रोफ्ट या दोन्ही खेळाडूंनी बंदीच्या निर्णयाविरुद्ध अपील करणार नसल्याचे जाहीर केले आहे.
याबद्दल त्यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे. स्मिथने ट्विटमध्ये म्हटले आहे की “या सगळ्या गोष्टी मागे टाकण्यासाठी मी काहीही करेल आणि मी पुन्हा माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पुनरागमन करेल. पण मी संघाचा कर्णधार म्हणून सर्व जबाबदारी घेतली आहे आणि मी जे बोलतोय त्याचा अर्थ मला माहित आहे.”
“मी क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या निर्णयाला आव्हान देणार नाही. एक चांगला संदेश जावा यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून हे निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि मी त्यांचा हा निर्णय स्वीकारला आहे.”
https://twitter.com/stevesmith49/status/981407491752853504
तसेच बॅनक्रोफ्टने त्याच्या ट्विट मध्ये म्हटले आहे की ” आज मी क्रिकेट ऑस्ट्रेलियाककडे कागदपत्रे दाखल केली आहेत आणि त्यांनी जे निर्णय घेतले आहेत त्यांना स्वीकारले आहे. जे काही झालं त्याला मागे टाकून ऑस्ट्रलियाच्या चाहत्यांचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी हवे ते करेल. ज्यांनी पाठिंब्याचे संदेश पाठवले त्यांचे धन्यवाद.”
https://twitter.com/cbancroft4/status/981441426230792193
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्मिथ आणि वॉर्नरवर १ वर्षाची तर बॅनक्रोफ्टवर ९ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. तसेच स्मिथ आणि बॅनक्रोफ्टला पुढील दोन वर्ष नेतृत्व करता येणार नाही. त्याचबरोबर चेंडू छेडछाड प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असणाऱ्या वॉर्नरचे नाव यापुढे कधीही नेतृत्वासाठी ग्राह्य धरले जाणार नसल्याचाही निर्णय क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घेतला आहे.






