ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ सध्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणला जातो. आपल्या आगळ्यावेगळ्या फलंदाजीने तो नेहमीच विरोधी गोलंदाजांना त्रासदायक ठरतो. सध्या विश्रांती घेत असलेल्या स्मिथने नुकताच सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी एका चाहत्याने त्याला तो ज्या क्रिकेटपटूंविरुद्ध खेळला त्या क्रिकेटपटूंपैकी सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटूंचे नाव विचारले. विशेष म्हणजे त्याने याचे उत्तर देताना एका भारतीय फलंदाजाचे नाव घेतले.
हा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट विरोधी खेळाडू
ऑस्ट्रेलियाचा सध्याचा सर्वोत्तम फलंदाज असलेला स्टीव्ह स्मिथ वेस्ट इंडीज दौऱ्यावर गेलेला नाही. यावेळी त्यानी नुकताच सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांशी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी एका चाहत्याने त्याला आतापर्यंतच्या सर्वोत्तम विरोधी खेळाडूविषयी विचारले. त्यावर स्मिथने भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचे नाव घेतले. त्याने त्याच्या प्रश्नावर उत्तर देताना सचिन तेंडुलकरला टॅग केले.
स्मिथने एकदा बाद केले आहे सचिनला
क्रिकेट विश्वातील आजवरचा सर्वात्तम फलंदाज म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरला एकदा बाद करण्याची किमया स्मिथने केली आहे. सध्या उत्कृष्ट फलंदाज असलेल्या स्मिथने आपल्या कारकीर्दीची सुरुवात लेगस्पिनर म्हणून केली होती. २०१३ मध्ये भारत दौऱ्यावर आलेला असताना स्मिथने मोहाली कसोटीत सचिनला ३७ धावांवर बाद केले होते. मात्र, या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता. सचिनने याच वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती देखील जाहीर केली होती.
भारताशी स्मिथचा आहे नजीकचा संबंध
स्टीव्ह स्मिथ याचा भारताशी खूप नजीकचा संबंध आहे. तो गेली १० वर्ष आयपीएलमध्ये सहभागी होतोय. त्याने आतापर्यंत आयपीएलमधील सहा संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. दोन वर्ष तो राजस्थान रॉयल्सचा, तर प्रत्येकी एक वर्ष रायझिंग पुणे सुपरजायंट व पुणे वॉरियर्स इंडिया संघाचा कर्णधार होता. त्याच्याच नेतृत्वात रायझिंग पुणे सुपरजायंटने २०१७ आयपीएलमध्ये अंतिम फेरीपर्यंत प्रवास केलेला. सध्या तो दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व करतो.
महत्त्वाच्या बातम्या –
श्रेयसची मैदानात उतरण्याची प्रतीक्षा लांबली, ‘या’ महत्त्वपूर्ण स्पर्धेतून घेतली माघार
क्रीडामंत्री मनोज तिवारी करतोय रणजी ट्रॉफीची तयारी, संघात झाली निवड
शतक करण्याचा विचार मनात आल्यानंतरही नाबाद राहण्यावर का केले फोकस? शिखर धवनने केला खुलासा